लॅाकडाऊनच्या भितीने परप्रांतीय मजुरांनी धरला गावचा रस्ता

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईत कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला असून लवकरच निर्बंध लागू केले जातील अशी भिती आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई परिसरातील परप्रांतियांनी मजूर गावी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दी करत असून काल गुरुवारपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांची गर्दी वाढत आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे २० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लाॅकडाऊन लावणार नाही, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र परप्रांतीय मजूर घाबरलेले आहेत. लाॅकडाऊन लागला तर काम बंद पडणार, मग खाणार काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कालपासून टिळक स्थानकावर परप्रांतीय कामगारांची गर्दी जमू लागली आहे. अनेकांना रेल्वेचे तिकीटही मिळालेले नाही. मात्र कामगार येथून हलले नाहीत.उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारला जाणाऱ्या बहुतांश गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून सुटतात. अशा स्थितीत गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून लोकमान्य टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसते आहे. पोती, पिशव्या आणि ब्रीफकेस डोक्यावर घेऊन कामगार टिळक टर्मिनस गाठत आहेत. बहुतेक गाड्या पहाटेच्या आहेत. त्यामुळे कामगार कुटुंबकबिल्यासह रात्रीच स्टेशनवर पोहोचत आहेत.स्टेशनबाहेरील अनेकजण तिकीट आणि ट्रेनबाबत संभ्रमात आहेत. तिकीट नसलेल्यांनी परत जावे, एवढीच घोषणा स्टेशनवर केली जात आहे. असे असले तरी रेल्वे प्रशासनाकडून टिळक टर्मिनसवर उसळलेली गर्दी सामान्य असल्याचे सांगण्यात आले.

Previous articleराज्यात लॅाकडाऊन करणार नाही मात्र कठोर निर्बंध लागणार
Next articleमोदीचा ताफा अडवण्याच्या घटनेची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली मागणी