नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

मुंबई नगरी टीम

नागपूर । गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्प हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असून यामध्ये आत्तापर्यंत वीस हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे तसेच या प्रकल्पामुळे सहा हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरून राज्य सरकार हा प्रकल्प थांबवणार नाही त्यांचा धमक्यांना घाबरून महाऱाष्ट्र थांबणार नाही अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

विधानसभेत विधानसभेत विरोधकांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे गडचिरोलीतील आमदार तसेच माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकीचे पत्र दिल्याबद्दल मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी तर राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अशीही सूचना यावेळी केली तर सदस्य डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री व मागील सरकार मधील गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अशाच प्रकारे याच प्रकल्पावरून नक्षलवाद्याकडून धमकी देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत सुरजागड प्रकल्प थांबवणार नाही या प्रकल्पामध्ये वीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सहा हजार स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच लहान व्यवसायाच्या संधी देखील यामुळे स्थानिकांना मिळणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक तरुण आता नक्षलवादापासून दूर गेले आहेत त्यामुळे प्रत्यक्षात छत्तीसगड आणि ओडिसा या राज्यांमधून नक्षलवाद्यांची चळवळ चालवली जाते. मात्र तथापि या प्रकरणी धर्मराव बाबा आत्राम यांना आलेली धमकी लक्षात घेता राज्य सरकार त्यांना पूर्ण संरक्षण देईल व हे प्रकरण राज्य सरकार गांभीर्याने हाताळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याच प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून देण्यात आली होती. त्यावेळी विरोधकांनी देखील एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केली होती. मी स्वतः त्यावेळी राज्याचा गृहराज्यमंत्री होतो आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याची शिफारस केली होती तथापि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनाही झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारली असेही यावेळी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला सांगितले.

Previous articleऐकावे ते नवलच : खबरदारी म्हणून विधानभवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास बंदी
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहताच आदित्य ठाकरे यांची जोरदार घोषणाबाजी..खोके सरकार हाय..हाय !