ऐकावे ते नवलच : खबरदारी म्हणून विधानभवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास बंदी

मुंबई नगरी टीम

नागपूर । राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. यंदा प्रथमच विधानभवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला आहे.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्लानंतर राज्यभरात प्रकरण गाजले होते. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनवर बंदी घालण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्र द्रोहाला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाचे, महाआघा़डीचे सर्व आमदार आंदोलनात सहभागी झाले.पहिला दिवस तसा शांत गेला. विधानसभेतही फारसे काही झाले नाही. आमदार आत्राम यांनाही मुख्यमंत्र्यांसारखी झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यावर बोलताना गृहराज्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे नक्षल्यांची धमकी मिळाली त्यावेळीही झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी पुढे आली होती. गृहराज्यमंत्री म्हणून मी संपूर्ण माहिती घेऊन सुरक्षा देण्याचा अहवाल दिला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फाईलवर सहीच केली नाही. आजही ती फाईल गृहमंत्रालयात उपलब्ध असेल तर पाहून घ्या असे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Previous articleआमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह विधानभवनात ; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
Next articleनक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले