महाराष्ट्रात मंकीपॉक्सचे एकही प्रकरण नाही ;कुठलेही भय मनात बाळगू नका : राजेश टोपे

मुंबई नगरी टीम

मुंबई । मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा भारतात नाही.त्यामुळे मंकीपॉक्सचे कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करत आहोत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यामधील ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई आणि पुणे इथे कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.एकूण साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय रूग्ण सध्या राज्यामध्ये आहेत. त्यातील अडीच हजार रूग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत.रूग्णालयात रूग्ण दाखल होण्याच्या संख्येमध्ये मात्र वाढ दिसत नाही. तसेच रूग्णालयांमध्ये रूग्णांची भर्ती मोठ्या प्रमाणात होत नसल्याने सध्यातरी जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नसल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. पावसाळ्यात साथीचे रोग वाढतात कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी पाणी साचलेले दिसते. त्या साचलेल्या पाण्यात मच्छरांची पैदास होते. ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे, तेथील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागातून नेहमीच दिल्या जातात, असेही टोपे म्हणाले.

Previous articleआकड्यांचा फसवा खेळ न करता पेट्रोल आणि डिझेलवरील कर ५० टक्के कमी करा
Next articleमध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळायला अडचण येणार नाही : छगन भुजबळ