मोदीचा ताफा अडवण्याच्या घटनेची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जे घडले त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातले शुक्रवारी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे पंजाबात सरकार असून काँग्रेस महाराष्ट्रात सेनेबरोबर सत्तेत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.पंजाबमधून आपण सुखरूप आलो, जिवावरच्या संकटातून बचावलो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. हा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भावना देशाची चिंता वाढवणाऱ्या आहेत. अशा घटना यापुढे घडणार नाहीत याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी. पंतप्रधान मोदी यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो असेही ठाकरे म्हणाले.५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या भटिंडा येथे पोहोचले होते. येथून त्यांना हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जायचे होते. पण अपुरा प्रकाश आणि पावसामुळे पीएम मोदी यांना तब्बल २० मिनिटे वाट पाहावी लागली. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला.पंजाब डीजीपी कडून सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे रस्त्याने गेले.

पंतप्रधान मोदींचा ताफा हा राष्ट्रीय हुतात्मा स्मारक पूर्वी सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावर पोहोचला, तेव्हा शेतकरी आंदोलकांनी इथे रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटे थांबावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.

Previous articleलॅाकडाऊनच्या भितीने परप्रांतीय मजुरांनी धरला गावचा रस्ता
Next articleभाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली