राजकीय स्वार्थासाठी महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपुरच्या घटनेचा वापर

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रात सरकारपुरस्कृत बंद कधीच झाला नाही. महाराष्ट्र बंदसाठी सरकारी यंत्रणांकडून दबाव आणण्याचं काम मविआ नेते,पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे. लखीमपुर येथे झालेली घटना वाईट आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो. संपूर्ण देश या घटनेचा निषेध व्यक्त करत आहे. परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारकडून लखीमपुरच्या घटनेचा वापर होत असल्याची टीका आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

राज्यात आज महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या महाराष्ट्र बंदसंदर्भात माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, लखीमपूरच्या घटनेचं दुर्दैवी राजकारण महाविकास आघाडीकडून होत आहे. नागपूरमध्ये जेव्हा गोवारी हत्यांकड झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं…तेव्हा सरकारने बंद पुकारला होता का ? मावळमध्ये ज्या पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून शेतकऱ्यांवर गोळीबार केला, त्यावेळी सुध्दा सत्तेवर असलेल्या या सरकारच्या संवेदना कुठे गेल्या होत्या ? पालघरला साधुचं हत्याकांड झालं त्यावळी दोन शब्दाचा निषेध तरी याच महाविकास आघाडी सरकारने व्यक्त केला का होता का… तेव्हा सरकारने बंद का पुकारला नाही. गेल्या २ वर्षांपासून महाराष्ट्र पुरपरिस्थितीने हैराण आहे, निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून गुलाबी चक्रीवादळने मराठवाडयाची पूर्ण वाताहत झाली आहे. तेथील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यांना धीर दिलासा देण्यासाठी साधा सरकारचा पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री त्या भागात गेले होते का ? असे थेट सवाल उपस्थित करत दरेकर यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

बंद यशस्वी करण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न
महाराष्ट्रातील आजचा बंद हा राज्य सरकार पुरस्कृत आहे. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी व्यापारी संघटनांना सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडूनच दमबाजी होत आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू राहणार असल्याचे आधी सांगण्यात आले पण तेथे सुध्दा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी दबाव टाकून त्या बंद केल्या. बाजार समित्या सरकारच्या अखत्यारीत येतात परंतु त्याही बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे सर्व ठिकाणी केवळ दबाव तंत्राचा वापर करत बंद यशस्वी करण्याचा केविलवाणा प्रयत्न झाल्याची टिका दरेकर यांनी केली.

महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष
महाराष्ट्रात विविध स्तरावर सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष व आक्रोश आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कोविडमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक विवंचना निर्माण झाली होती. परंतु तरीही सरकारने त्यांना एक रुपयाचं सहाय्य केलं नाही. इतर राज्यांनी शेतकऱ्यांसाठी इतर चांगले पॅकेज जाहीर केले, परंतु महाविकास आघाडी सरकारने एक नवी दमडी आर्थिकदृष्ट्या शेतक-यांना दिली नाही. त्यावेळी शेतक-यांच्याप्रति असणारा तुमचा कळवळा कुठे गेला होता ? असा सवाल करत दरेकर पुढे म्हणाले, राज्यात दोन वर्षांपासून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मराठवाडयातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. परंतु त्या शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत नाही, त्यांना पीक विमा मिळत नाही, त्यांचं वीज बिल कापलं जात आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ना पालकमंत्री गेले ना राज्याचे मुख्यमंत्री. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निसर्ग चक्रीवादळानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घोषणा केली होती की, ५० हजार रुपये हेक्टर बागायतीसाठी आणि कोरडवाहूसाठी २५ हजार रु.ची मदत देणार. मग आता शेतक-यांसाठी केलेल्या त्या घोषणा कुठे गेल्या…कुठे गेले त्या संवेदना, शिवसेनेने पीक विमाच्या मागणीसाठी विमा कंपन्यांवर मोर्चे काढले,कंपन्याची कार्यालय तोडण्यात आली. काही दिवसपूर्वी मी देवेंद्र फडणवीस यांच्यासाहित मराठवाडा दौरा केला त्यावेळेला शेतकरी सांगत होते की, आम्हाला पीक विम्याचे पैसे अजूनही मिळाले नाही. मग महाराष्ट्रातील शेतक-यांना वा-यावर सोडणारी ही महाविकास आघाडी लखीमपूरचं राजकारण येथे का करीत आहात असा सवालही दरेकर यांनी केला.

सरकारच्या बोलण्यात आणि करण्यात फरक
बंदच्या काळात आज अज्ञात व्यक्तींकडून ८ बसेसची तोडफोड करण्यात आली, त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, दबाव तंत्र वापरुन संप यशस्वी करण्याचा हा प्रयत्न दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षांकडूनच असे प्रकार होत असतील तर आपल्या घरच्या वस्तूंचं नुकसान आपण करत आहात. एकाबाजूला नवीन इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन करायची आणि दुसऱ्या बाजूला बसेसची तोडफोड करायची, यावरुन बोलायचे एक आणि करायचे दुसरे यामध्ये फरक दिसून येत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

Previous articleआयकर खात्याच्या छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद
Next articleभगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग ! पंकजा मुंडे काय बोलणार याकडे लक्ष ?