विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला; दहा जागांसाठी २० जूनला मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यातील दहा विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे.भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

विधान परिषदेचे १० सदस्य जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त होत आहेत. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे चार तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. तर कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र दहाव्या जागेसाठी कॉंग्रेसला मतांची गरज असून या जागेसाठी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय दौंड, शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते,विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड हे सदस्य निवृत्त होणार आहे. तर भाजपचे रामनिवास सिंह यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे.

यंदा भाजपचे दोन सदस्य कमी होणार आहेत. यामुळे भाजपकडून कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर २७ मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ होत आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात.  त्यामुळेच आता या चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीचे बलाबल

राष्ट्रवादीचे ५४, शिवसेना ५६ आणि कॉंग्रेसचे ४५ आमदार आहेत. विधानपरिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे.

भाजपकडून कोण आहे इच्छुक ?

एकीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, प्रसाद लाड ,अनिल बोंडे, राम शिंदे, कृपाशंकर सिंह यांचीही नावे चर्चेत आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२ जून- अधिसूचना जारी
९ जून- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
१० जून- अर्ज छाननी
१३ जून- अर्ज माघारी घेता येईल
२० जून- सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान व मतमोजणी

Previous articleमहाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरून आक्रोश करण्यापेक्षा भाजपने दिल्लीत जाऊन आक्रोश करावा
Next article‘वहिनी’ कान्सला जातील आणि ‘भाऊ-दादांना’ घरी स्वयंपाक करत बसावं लागेल