‘वहिनी’ कान्सला जातील आणि ‘भाऊ-दादांना’ घरी स्वयंपाक करत बसावं लागेल

मुंबई नगरी टीम

मुंबई । तुम्ही घरी जा,स्वयंपाक करा. दिल्लीत जा,नाही तर मसणात जा, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.या वक्तव्याचा राष्ट्रवादीने निषेध केला आहे.तर या वक्तव्यावरून काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.त्यांनी ट्विट करीत “चंद्रकांत दादा,आता वेळ अशी आलीय की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल असा टोला लगावला आहे.

दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल केला होता.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले.दोन दिवसांत असे काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचे उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे. मध्य प्रदेश बाबत जो निर्णय दिला आहे तो अंतिम निर्णय नाही. त्यामुळे मध्य प्रदेशला जमले आणि तुम्हाला जमले नाही यात खोटेपणा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या या टीकेचा समाचार घेत ‘तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता,घरी जा आणि स्वयंपाक करा.तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही.तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.पाटील यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.राज्यात ठिकठिकाणी पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

दुसरीकडे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावले आहेत.अमृता फडणवीस या सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्याचा संदर्भ देत पाटील यांच्या विधानासंदर्भातील कात्रण शेअर करत यशोमती ठाकूर यांनी ट्विट करीत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला आहे.चंद्रकांत दादा, आता वेळ अशी आलीय की वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी स्वयंपाक करत बसावं लागेल. काळ बदललाय, महिलांना कमी लेखू नका. महिला तुमचं दुकान कधी उखडून टाकतील समजणार ही नाही, असे यशोमती ठाकूर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

Previous articleविधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला; दहा जागांसाठी २० जूनला मतदान
Next articleराज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही: अजितदादांनी वर्तविला अंदाज