विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर;मविआ आणि भाजप पुन्हा आमने सामने

मुंबई नगरी टीम

मुंबई । स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या मुंबईतील दोन, धुळे -नंदुरबार,नागपूर, कोल्हापूर आणि अकोला – वाशिम – बुलढाणा या पाच मतदार संघातील ६ जागांसाठी येत्या १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे.तर अहमदनगर आणि सोलापूर या मतदारसंघात एकूण मतदारांच्या ७५ टक्के मतदार अपात्र ठरल्याने येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने आज या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्याने या निवडणूकीच्या निमित्ताने राज्यात पुन्हा महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूकीची घोषणा करीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.मुंबईतील दोन, धुळे – नंदुरबार,नागपूर, अहमदनगर, सोलापूर,कोल्हापूर आणि अकोला – वाशिम – बुलढाणा या ८ स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधान परिषदेवर निवडून गेलेले ८ आमदार येत्या १ जानेवारी २०२२ रोजी निवृत्त होत आहेत.कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील ५ महानगरपालिका आणि २०० हून अधिक नगरपालिकांची मुदत संपल्याने तेथील नगरसेवक मतदानास मतदार म्हणून अपात्र ठरले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण मतदारांच्या ७५ टक्के मतदार पात्र असतील तरच निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून मागील पंधरवड्यात पात्र मतदारांची यादी मागवली होती.त्यानुसार अहमदनगर आणि सोलापूर या मतदारसंघातील २५ टक्केपेक्षा अधिक मतदार अपात्र ठरले आहेत.त्यामुळे या दोन जागांवरील निवडणूक स्थगित करत उर्वरित ५ मतदारसंघातील ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे.यात मुंबईतील दोन, धुळे – नंदुरबार, नागपूर, कोल्हापूर आणि अकोला – वाशिम – बुलढाणा आदी सहा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडणूक द्यावयाच्या जागांचा समावेश आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ नोव्हेंबर २०२१ या निवडणूकीची अधिसूचना जारी केली जाईल.तर या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २३ नोव्हेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे.२४ नोव्हेंबर २०२१ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल.तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर २०२१ आहे.१० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या निवडणूकीसाठी मतदान घेण्यात येवून १४ डिसेंबर २०२१ रोजी मतदान मोजणी करण्यात येईल.विधानपिरषदेच्या ६ जागांसाठी होणा-या या निवडणूकीच्या निमित्ताने राज्यात पुन्हा महाविकास आघाडी आणि भाजपा आमने सामने येणार आहेत.

हे ८ आमदार १ जानेवारी रोजी होणार निवृत्त

रामदास कदम (शिवसेना) मुंबई
भाई जगताप (काँग्रेस) मुंबई
अमरिश पटेल (भाजप) धुळे नंदुरबार
गिरीश व्यास (भाजप) नागपूर
सतेज ऊर्फ बंटी पाटील (काँग्रेस) कोल्हापूर
गोपीकिसन बजोरिया (शिवसेना) अकोला- वाशिम- बुलढाणा.
अरुण जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर
प्रशांत परिचारक (भाजपपुरस्कृत अपक्ष) सोलापूर

Previous articleउद्या सकाळी दहा वाजता अंडरवर्ल्डशी संबंधित ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार
Next articleएसटीचा संप चिघळणार : ४५ आगारांमधील ३७६ एसटीचे कर्मचारी निलंबित