भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंजाबातील घटनेनंतर भाजप नेत्यांची वक्तव्ये, पंतप्रधानाचे ‘जिवंत परत आलो’ हे विधान आणि त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेणे हा घटनाक्रम लक्षात घेता शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने हे सर्व ठरवून केले असून नरेंद्र मोदी आणि भाजपने राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेच्या त्रुटीचे प्रकरण हे ठरवून केलेला डाव आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम अचानक का बदलण्यात आला, त्यामागे काय हेतू होता ? असा सवालही पटोले यांनी भाजपला केला आहे. काँग्रेसच्या डिजिटल सदस्यता नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आज टिळक भवनमध्ये पार पडला. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

पटोले म्हणाले की, पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड होता कामा नये. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी सविस्तर प्रकाश टाकलेला आहेच. परंतु भाजपकडून जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देत काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. या घटनेला भाजपने एक इव्हेंट बनवले आहे, असा आरोप त्यांनी केला.पंतप्रधानांची सुरक्षा ही एसपीजीकडे असते. अनेक महत्वाच्या केंद्रीय यंत्रणा त्यात सहभागी असतात म्हणून भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरासमोरच आंदोलन करून त्यांना जाब विचारावा, असा सल्लाही पटोले यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याजवळ जे लोक गेले होते ते भाजपचे कार्यकर्ते होते. तेथे नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या, असे पटोले म्हणाले.

Previous articleमोदीचा ताफा अडवण्याच्या घटनेची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांनी केली मागणी
Next articleकडक निर्बंध लागू : मध्यरात्रीपासून काय सुरू,काय बंद राहणार !