मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू करताना हातावर पोट असणा-या पाच लाख फेरीवाल्यांसह,बारा लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला असतानाच आता राज्यातील तृतीपंथीयांना एकरकमी १५०० रुपयांचे अनुदान देण्याबाबच्या हालचाली सामाजिक न्याय विभागाकडून सुरू झाल्या आहेत.
१४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.ही घोषणा करताना त्यांनी हातावर पोट असणा-या सर्वसामान्य जनतेला दिलासा देत पाच लाख फेरीवाल्यांसह,बारा लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली.या घोषणेमुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे.कोरोनाच्या संकटात राज्यातील तृतीपंथीयांही दिलासा देण्याच्या हालचाली सामाजिक न्याय विभागाकडून केल्या जात आहेत.तृतीपंथीयांना दिलासा देण्यासाठी त्यांना एकरकमी १५०० रुपयांचे अनुदान देण्याबाबत सामाजिक न्याय विभागाकडून सकारात्मक पाऊल उचलले जात आहे.तृतीपंथीयांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्यातील तृतीपंथीयांची असणारी संख्या,या निर्णयामुळे राज्य सरकारवर पडणारा भार,तसेच त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल,याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने सर्व प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्तांना दिले आहेत.त्यानुसार येत्या २६ एप्रिलपर्यंत सविस्तर माहिती आयुक्तालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
#कोविड१९ च्या काळात तृतीपंथीयांना एकरकमी १५०० रुपयांचे अनुदान देण्याबाबत राज्याचा सामाजिक न्याय विभाग सकारात्मक पाऊल उचलत आहे. हा निर्णय झाल्यास या समुदायाची कोरोनाच्या काळात होणारी उपासमार टळेल. ही मदत कशा पद्धतीने देता येईल याबाबत प्रशासकीय पातळीवर विचारविनिमय होत आहे. pic.twitter.com/uSAcgH84KD
— Supriya Sule (@supriya_sule) April 21, 2021
त्यामुळे लवकरच राज्यातील तृतीपंथीयांना एकरकमी १५०० रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे.हा निर्णय झाल्यास या समुदायाची कोरोनाच्या काळात होणारी उपासमार टळेल.ही मदत कशा पद्धतीने देता येईल याबाबत प्रशासकीय पातळीवर विचारविनिमय होत आहे.लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल असा मला विश्वास आहे.या समुदायाच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्याबाबत प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया सुरु केल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार असे खा.सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.