मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक दिवसांनी त्यांनी मुंबईची सैर केली.राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून पवार यांना प्रश्न विचारून जुन्या आठवणींना उजाळा दिला.साधारत: १९६२-६३ च्या दरम्यान युवक काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या शरद पवार यांनी चक्क पाच वर्षे टिळक भवनात मुक्काम केल्याची माहिती या संवादाद्वारे दिली.
— मुंबई नगरी (@mumbainagriNews) May 7, 2021
ब्रीच कॅण्डी रूग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून,कोरोना संकटात काही घटकांना मदत करण्याची मागणी केली.त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी गाडीतून मुंबईचा फेरफटका मारला.सिल्वर ओक ते वरळी सी-लिंक प्रवासा दरम्यान सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पवार यांच्याशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.सध्याची मुंबई आणि पूर्वीची मुंबई या विषयावर या दोघांनी गप्पा मारल्या.पवारांनी जुनी मुंबई कशी होती, काळानुसार काय काय बदलत गेले,आपण मुंबईत कधी आले, कुठे राहिलो, हे सर्व त्यांनी या दरम्यान सांगितले.
— मुंबई नगरी (@mumbainagriNews) May 7, 2021
आपण १९७१ मध्ये मुंबई मध्ये आलो ना.. मी आणि आई मुंबईत आलो..असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर,मी साधारणत: १९६२-६३ मध्ये युवक काँग्रेसचा सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुंबईत आलो.. त्यावेळी दादरला खेड गल्ली होती. तिथे सगळे मिल कामगार राहत होते.या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील लोक जास्त होते.आता त्याचे नाव काकासाहेब गाडगीळ मार्ग असे आहे.. आता त्या ठिकाणी काँग्रेसचे टिळक भवन आहे.आम्ही तिथे चक्क ५ वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो. मी आणि काँग्रेस नेते बरोबर असायचो. आता सगळं बदललं आहे,अशी आठवण पवार यांनी यावेळी सांगितली.टिळक भवनाचा परिसर हा सामान्य लोकांचा होता.त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कोकणातील लोक राहिचे.लालबाग, परळ आदी परिसर कष्टक-यांचा कामगारांचा होता.आम्ही एकत्र येवून सगळे सण साजरे करायचो.त्या वेळी आपल्याला घाटावरचे लोक असे म्हणायचे, आपण सगळे घाटी होतो अशीही आठवण पवार यांनी सांगितली.
गावाकडून कोणी मुंबईत आला तर आम्ही सरळे जण त्यांची उठबस करायचो,त्याला चांगलं जेवण वगैरे द्यायचो. त्याला सिनेमा दाखवायचो,तो पाहुणा गावाकडं गेल्यावर याची सर्व माहिती गावाकडच्या लोकांना सांगायचा.त्यावेळची मुंबई वेगळी होती,आता सरळं बदललं आहे.मराठी माणूस गेला त्या ठिकाणी बहुमजली इमारती आल्या,समाजकारण बदललंय,सर्व काही बदललं आहे.अशी माहिती सांगून पवार यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या.