मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत १ जून रोजी संपत असल्याने आणि राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे येत्या मंगळवार नंतर राज्यात लॉकडाऊन वाढवणार की सध्या असलेले कडक निर्बंध शिथिल केले जाणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले असतानाच याच पार्श्वभूमीवर आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असून,लॉकडाऊनबाबत महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील.
आमच्या फेसबुक पेजवर पहा: https://t.co/inT9S1ArT0 pic.twitter.com/JQ0ZQXdCNj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 30, 2021
राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने गेल्या दीड महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू करून कडक निर्बंध लावले आहेत.अत्यावश्यक सेवेतील दुकाने ११ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा देतानाच इतर सेवा पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत.मुंबईतील लोकल सेवाही केवळ अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच सुरू ठेवण्यात आली आहे.कडक निर्बंध आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र सध्या राज्यात असले तरी राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरू आहे.मुंबई,पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असल्यामुळे लॉकडाऊन हटवण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली असतानाच राज्यातील लॉकडाऊन अजून काही दिवस वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.त्यामुळे आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे काय घोषणा करणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री ८:३० वाजता समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत.यावेळी लॉकडाऊन,उपाययोजना,लसीकरण,राज्यातील लसीचा तुटवडा तर दुस-या लाटेत तरूणांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर तिस-या लाटेत बालकांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यावर भाष्य करण्याची शक्यता आहे.मुंबई,पुणे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात अजून १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.एकदम लॉकडाऊन उठवण्याऐवजी शिथिलता देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.दीड महिन्याच्या निर्बंधामुळे व्यापा-यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने पहिल्या टप्प्यात व्यवहार सुरळीत करण्यावर भर दिला जावू शकतो.तर दुस-या टप्प्यात हॅाटेल,बार आणि मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जावू शकते.चौथ्या टप्प्यात धार्मिक स्थळे लोकल सेवा आणि जिल्हाबंदी उठवण्याची शक्यता आहे.