मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य सरकार ओबीसींची बाजू नीटपणे मांडू शकले नाही,त्यामुळेच राजकीय आरक्षण गेले.यासाठी आता आम्ही न्यायालयात दाद मागणार असून,ओबीसींना आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही,त्यामुळे येत्या २६ जून रोजी राज्यभर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगतानाच जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही.तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही,असा इशारा माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला.
ओबीसी आरक्षण प्रश्नांवर भाजप नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.”आरक्षण हा सर्वच पक्षातील ओबीसी नेत्यांचा हा विषय आहे.आम्ही ओबीसींच्या हितासाठी काहीही करायला तयार आहोत.आज पक्षाने घेतलेल्या बैठकीत येत्या २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या बैठकीबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही.मंत्र्यांना भरपूर अधिकार असतात. सरकारला भरपूर अधिकार असतात. त्यावेळी आमच्याकडे निर्णय क्षमता होती. योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती. त्यामुळे आम्ही ओबीसींचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी पावलं टाकली.अध्यादेश काढले.या सरकारची मानसिकता तशी नाही. त्यामुळे तो अध्यादेश बाद झाला.राज्य सरकार ओबीसींची बाजू मांडू शकले नाहीत म्हणून आरक्षण गेलं आहे. त्यामुळे आता मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची काय गरज आहे ? त्यांनी निर्णय घेण्याची गरज आहे.त्यांनी तत्काळ निर्णय करावा.जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही.तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. आम्ही न्यायालयातही जाऊ,” असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
अजितदादांकडून हे अपेक्षित नव्हतं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले गाऱ्हाणे मांडण्यास जाणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे. अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं,अशी टीका मुंडे यांनी केली आहे.हा सगळा प्रकार संतापजनक आहे.ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले.स्वत:च्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले आहेत तर जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजित पवारांची भेट घडवून आणणे तिथल्या स्थानिक नेत्यांचे काम होते.त्यांनी ठरवले असते तर गोंधळ झाला नसता.मागण्या तर पूर्ण होत नाहीत,पण किमान भेट आणि बोलू द्यायला हवं होते.स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे.अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं”,अशा शब्दात मुंडे यांनी टीका केली आहे.