संघर्ष चालू ठेवायचा असेल तर…. चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

मुंबई नगरी टीम

पुणे । आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत,याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल,असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले की, समाजाच्या कोणत्याही घटकाने अन्यायाच्या विरोधात बोलता कामा नये,असे या सरकारचे धोरण आहे.कोणीही आंदोलन केले की लगेच गुन्हे दाखल करायचे, लाठीचार्ज करायचा असे चालू आहे.ज्या आशा कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन गेली दीड वर्षे कोरोनाच्या साथीत काम केले त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांनी गाडीत बसून ऐकून तरी घ्यायला हव्या होत्या. पण ‘हम करे सो कायदा’, असे चालू आहे, याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रश्नावर भाजपा सरकारला धारेवर धरेल.आपले राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे. आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते.तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत असा इशारा देतानाच,महानगरपालिकांची वॉर्ड रचना करताना शहराच्या विकासाचा विचार करायला हवा.राज्य सरकारने कोणतीही रचना आगामी निवडणुकीत आणली तरी भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही.भाजपाची संघटनात्मक रचना बळकट आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous articleजोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही,तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही
Next articleमुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड ? नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल