मुंबई नगरी टीम
मुंबई । काँग्रेस केंद्रात सत्तेत होती त्यावेळेला ईडीच्या चौकशीचा दबाव टाकून सत्ता कशी राखली हे देशाला माहित आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय संजय राऊत यांना आहे,त्यांच्या टीकेला काडीची किंमत नसुन त्यांचे वक्तव्य संदर्भहीन,असल्याची टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात दाखवला गेला. लाईव्ह स्क्रीन द्वारे याचे प्रक्षेपण करण्यात आले.या कार्यक्रमानंतर प्रविण दरेकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना महाविकास आघाडी, संजय राऊत यांच्यावर टीका केली.दरेकर म्हणाले की, ईडी आणि सीबीआय देशातील स्वायत्त संस्था आहेत. संविधानात लोकशाही इतकी मजबूत आहे की, देशात कोणाचेही सरकार असो या संस्थाचा चुकीचा वापर करता येत नाही. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करता. चुकीचे काम केले असेल त्यांना तपास यंत्रणेच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते. पण दुर्देवी हे आहे की, तपासाला सामोरं जाताना असताना अडचणीत येतील अशी खात्री झाली असावी बहुदा म्हणुन या विषयाला राजकीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत,
दरेकर म्हणाले की, आरोप किंवा तक्रार दाखल झाली तर कुठलीही एजन्सी हा तपास करते. त्यामुळे अशा प्रकारे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. संजय राऊत यांना भाजप द्वेषाची काविळ झाली आहे. अभ्यासाविना व अज्ञानापोटी राऊत फडणवीस व भाजपवर टीका करत असतात, असा आरोप दरेकर यांनी केला.मराठा व ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस सरकारनं काय केलं त्याची माहिती घेऊन बोलल्यास राऊत आरोप करू शकणार नाही. फडणवीसांनीच मराठा व ओबीसी आरक्षण दिलीत पण ती महाविकास आघाडीला टिकवता आली नाहीत. ओबीसी राजकीय आरक्षण ज्यावेळेला रद्द झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून कायद्यात रूपांतर करून दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षण टिकवून ठेवलं.असेही त्यांनी सांगितले.