राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । राफेल फायटर जेटच्या व्यवहारात गौडबंगाल असून या व्यवहारात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केले. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही केली परंतु मोदी सरकारने या व्यवहाराची चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. परंतु सत्य जास्त दिवस लपत नसते आज फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरु झाली असून, मग भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही, असा सवाल उपस्थित करून सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी महसूलमंत्री व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

यासंदर्भात थोरात म्हणाले की, युपीए सरकारच्या काळातच १२६ राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी ५५६ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे १६७० कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला. तसेच मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते परंतु त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे मोदी सरकारने दुर्लक्ष करुन हे प्रकरण गुंडाळले.

राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली आहे. मग भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचे काम का केले जात आहे. मोदी सरकार चौकशी करायला का घाबरत आहे आणि कोणाला वाचवण्यासाठी चौकशीपासून पळ काढला जात आहे. राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य आहे असे थोरात म्हणाले.

Previous article३० साखर कारखान्यांवर कारवाई करा; चंद्रकांतदादांनी अमित शहांना पाठवली यादी
Next articleराफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा