मुंबई नगरी टीम
मुंबई । पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी राज्यभर काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.आज मुंबईत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.यावेळी उत्साही कार्यकर्त्यांचा बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्याने बैलगाडी तुटली आणि भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे नेते बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले.या घडलेल्या प्रकारावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
महागाईच्या विरोधात आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.आज मुंबईत अॅन्टॅाप हिल येथे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.आजच्या आंदोलनामध्ये एक बैलगाडी आणण्यात आली होती. त्यावर भाई जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उभे राहून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते.“देश का नेता कैसा हो,राहुल गांधी जैसा हो !” अशा घोषणा काँग्रेसचे कार्यकर्ते देत होते.याच दरम्यान बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते चढले त्यामुळे बैलगाडी तुटली आणि भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे नेते बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले.
'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार!
मा. @BhaiJagtap1 तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढंचं करावं!"
असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! pic.twitter.com/dbceBpX6J5— Prasad Lad (@PrasadLadInd) July 10, 2021
राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलं नाही : फडणवीस
या बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलं नाही. त्यामुळे ती बंडी तुटली, असे चित्र आहे. पण तरीही माझ्या त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ते नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.
कॉंग्रेसच्या आंदोलनाचे झालेले हसू महाराष्ट्राने पाहिले : प्रविण दरेकर
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या इंधन दरवाढी विरोधातील आंदोलनात बैलगाडीवरून भाई जगताप व अन्य कॉंग्रसेचे नेते खाली पडल्यामुळे झालेले कॉंग्रेसचे हसु संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले अशी टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन केले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगतापही खाली पडले. यावर प्रतिक्रिया देताना दरकेर म्हणाले की, राहुल गांधी जिंदाबाद घोषणा देत असताना माणसाचे तर दुरंच राहिले पण बैलालाही ते सहन झाले नसावे, असा टोला दरकेर यांनी लगावला.
दरकेर म्हणाले, इंधन दरवाढी विरोधातील मोर्च्यात एकाच वेळी या बैलगाडीवर अनेक कार्यकर्ते व नेते उभे होते. त्यामुळे वेळातच बैलगाडीचा हा भाग वेगळा होऊन तुटला आणि कार्यकर्ते खाली पडले. परंतु बैलगाडीवर असेलेल्या महिलांचाही विचार केला गेला नाही. त्यामुळे हे आंदोलन विस्कळीत आणि अनियोजन पद्धतीने पार पडेल. एका बाजूला राज्य सरकार कोरोना वाढल्याचे ओरडुन ओरडुन सांगत असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते व कार्यकत्यांनी आंदोलनाच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंग फज्जा उडविला व कोरोनाचे नियमही धाब्यावर बसवल्याचा असा आरोप दरेकर यांनी केला.