मुंबई नगरी टीम
मुंबई । भाजप पक्ष हा वॉशिंग मशीनसारखा असून,त्यांच्याकडे डाकू पण साधू होवू शकतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.राष्ट्रवादीची आणि भाजपची विचारधारा वेगळी असल्याने या दोन पक्ष एकत्र येणे शक्य नाही,अशा चर्चांमध्ये तथ्य नाही,असा खुलासा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत केला.
नारायण राणे हे कॉंग्रेस पक्षात असताना त्यांच्या परेल येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या.याशिवाय नारायण राणे अमित शहा यांना अहमदाबादला भेटल्याचा व्हिडीओ राणे यांनी नकार दिल्यानंतरही भाजपकडून व्हायरल करण्यात आला.त्याच पध्दतीने बंगालमध्ये भाजपने अनेकांना पक्षात प्रवेश दिला.म्हणजेच ईडी,सीबीआय व इतर यंत्रणांच्या दबावाखाली पक्षात प्रवेश कार अशी परिस्थिती भाजप निर्माण करत आहे.भाजपात प्रवेश केल्यावर चौकशा बंद केल्या जातात, ही सत्य परिस्थिती आहे.नितीन गडकरीही वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे बोलले होते याची आठवण मलिक यांनी करुन दिली. ईडीकडून शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली होती.त्यावेळी राष्ट्रवादीने ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई केल्याने ही नोटीस परत घेण्यात आली.त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अशा कारवाईला घाबरणार नाही असेही मलिक यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीही चुकीचे केलेले नसून,ते अशा यंत्रणांना सहकार्य करीत आहेत मात्र अशा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करतानाच,अशा चौकशा थांबाव्यात म्हणून आमचा कोणताही नेता मोदी-शहा यांची भेट घेत नसल्याचे मलिक यांनी सांगितले.
यावेळी मलिक यांनी मोदी पवार यांच्या भेटीवरही भाष्य केले.राष्ट्रवादीची आणि भाजपची विचारधारा वेगळी असल्याने हे दोन पक्ष एकत्र येणे शक्य नाही.अशा चर्चांमध्ये कसलेही तथ्य नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मात्र ही शक्यता मलिक यांनी फेटाळली.राष्ट्रवादीचा आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे.शिवाय या दोन पक्षांची विचारसरणी वेगळी आहे असेही मलिक म्हणाले.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर तयार करण्यात आले असून,ते व्यवस्थित चालले असताना हे सरकार पडण्याच्या तारखा काही जणांकडून देण्यात येवून मी पुन्हा येईन असे म्हणते आहे असा टोला त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

















