शरद पवारांच्या मोदी भेटीपूर्वी पवार- देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा !

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून सुमारे तासभर विविध विषयांवर चर्चा केली.मात्र पवार- मोदी भेटीपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात महत्वपूर्ण भेट झाल्याचे समजते.दिल्लीतील या भेटीगाठीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेली दोन दिवस नवी दिल्लीच्या दौ-यावर असून,नव्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून चर्चा केली.मात्र या भेटीबाबतचा तपशील समजू शकला नाही.त्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून सुमारे तासभर चर्चा केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.काल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेवून अनेक विषयांवर चर्चा केली होती.पवार -मोदी भेटीनंतर फडणवीस यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेवून चर्चा केल्याने तर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.या भेटीनंतर शरद पवार यांनी ट्विट करीत या भेटीची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या नेतेपदी पियुष गोयल यांची निवड झाल्यानंतर गोयल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पवार यांची भेट घेतल्याने विविध चर्चां सुरू झाल्या आहेत.सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असून,या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.पवार आणि मोदी भेट पंतप्रधान निवासस्थानी झाली नाही तर ही भेट पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली असल्याने या दोन नेत्यामध्ये नक्कीच महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.तर दुसरीकडे या भेटीत कृषी कायदा,सहकार क्षेत्रातील समस्या,राज्यात होत असलेली ईडीची कारवाई यावर चर्चा झाली असल्याचे समजते.

Previous articleआम्ही तुमच्या सोबत आहोत,काळजी करू नका’ लोणकर कुटुंबियाना मुख्यमंत्र्यांचा धीर
Next articleभाजप म्हणजे वॉशिंग मशीन;त्यांच्याकडे ‘डाकू’ पण ‘साधू’ होवू शकतो