मुंबई नगरी टीम
बीड । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून शहरात पहिल्यांदाच पार पडलेल्या सामुदायिक राष्ट्रगान कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक चळवळीसाठी ‘टर्निंग पॅाईंट ठरला.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सर्व सामान्य नागरिकांना सहभागी होता यावे आणि प्रत्येकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यासाठी पंकजा मुंडे यांनी शहरात पहिल्यांदाच सामुदायिक राष्ट्रगान कार्यक्रमाची संकल्पना यशस्वीपणे रूजवली. आज सकाळी ८.३० वा. द टर्निंग पॅाईटच्या माध्यमातून वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर हा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. शहरातील व्यापारी, डॅाक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, वकील, शालेय विद्यार्थी, युवक तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेऊन एका सुरात सामुदायिक राष्ट्रगान गायले. चिमुकल्या मुला मुलींनी भारतमाता, ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू, विविध महापुरुषांची साकारलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ही मुलं आपली महान संस्कृती आणि विविधतेतील एकतेचे दर्शन घडवत होते. वैद्यनाथ महाविद्यालयाचे एनसीसी पथकही यावेळी उपस्थित होते. राष्ट्रगीतानंतर तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडण्यात आले.
अन् पंकजाताईमुळे वाढला उत्साह
सामुदायिक राष्ट्रगीतानंतर पंकजा मुंडे यांनी आजी- माजी सैनिकांचा सन्मान केला व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्व नागरिकांमध्ये मिसळून त्यांचेशी संवाद साधला. महिला, मुली व विद्यार्थ्यांची त्यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी एकच झुंबड उडाली होती, त्यांच्या या कार्यक्रमातून सर्वांचाच उत्साह वाढल्याचे दिसून आले.