मुंबई नगरी टीम
मुंबई । गेल्या लोकसभा निवडणूकीत शिरूर मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव पत्कारावा लागल्याच्या कारणास्तव पुणे जिल्हा परिषद सदस्या आणि शिवसेनेच्या तिकीटावर दोन वेळा जुन्नरमधून विधानसभेची निवडणूक लढवलेल्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर त्यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिरूर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी त्यांचा केलेला पराभव आढळराव यांना चांगलात जिव्हारी लागला होता.मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून बुचके या नाराज होत्या.त्यातच लोकसभा निवडणूकीत जुन्नरमधून शिवसेनेला कमी मतदान झाल्याने बुचके यांना पक्षांतर्गत लक्ष करण्यात येत होते.त्यामुळे पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून शिवसेनेच्या तिकीटावर दोन वेळा जुन्नरमधून विधानसभेची निवडणूक लढवलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि सेना गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर त्यांनी आज भाजपात प्रवेश केला.भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.
भाजपच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेवर येईल,असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.तर भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते,असे आशा बुचके यांनी प्रवेश केल्यानंतर सांगितले.पक्षाची कार्यकर्ता म्हणून आपण प्रत्येक घरात कमळ पोहचविण्यासाठी काम करू असेही त्या म्हणाल्या.राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपाला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती.आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे.आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू.आशाताईंसारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपामध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले.आशा बुचके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा भाजपामध्ये सन्मान केला जाईल. भाजपामध्ये आतला,बाहेरचा,जुना,नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले की, आशाताई बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू.