मुंबई नगरी टीम
मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मुलगा आर्यमनला हा उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. आई या नात्याने पंकजा मुंडे या सध्या बोस्टनमध्ये असून,त्यांनी याची माहिती फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.याच पोस्टचा आधार घेत लेखक आणि शिक्षक असलेले लक्ष्मण खेडकर यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी फेसबुकवर पोस्ट केली असून,ऊसतोड मजूरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात,पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का ते ही जरा पाहा अशी विनवणी त्यांनी केली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात बोस्टनला गेला आहे. त्याला सोडण्यासाठी पंकजा मुंडे याही परदेशात आहे.याची माहिती त्यांनी फेसबुकद्वारे दिली आहे.त्यावर शिक्षक आणि लेखक असलेले लक्ष्मण खेडकर यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करीत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काही तरी करण्याची विनवणी केली आहे.
लक्ष्मण खेडकर यांनी आपल्या पोस्ट मध्ये काय म्हटले आहे ?
मा.पंकजा मुंडे ह्या स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या , ऊसतोड कामगारांच्या कार्यक्षम आणि संघर्षशील नेत्या, त्यांनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय असी बातमी सोशल मिडीयावर वाचली, आनंद वाटला, त्या बद्दल आमच काहीच म्हणणं नाहीय, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खुप खुप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा,
पंकजाताई ,आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजूरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का ते ही जरा पाहा,लोकांची मुंडके मोडून स्वत:ची घर भरणा-या बरबटलेल्या बाकीच्या बोलघेवड्या पुढा-यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीयेत,कसयं ? राज्याची नसली तरी केंद्रातली सत्ता तुमच्या हातात आहे,तुमच्या लहान भगिनी मा. प्रितमताई मुंडे ह्या खासदार आहेत तुम्ही स्वतः बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात ,करा काही तरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात..