१२ आमदार नियुक्तीचा योग्य निर्णय लवकरच; राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना शब्द

मुंबई नगरी टीम

मुंबई । गेल्या ९ महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या यादीला मंजूरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या यादीला मंजूर द्यावी,अशी विनंती यावेळी करण्यात आली.१२ सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्याबाबत मी योग्य निर्णय करतो, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.आता यावर राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज रात्री ७.३० वाजता मुख्यमंत्री ठाकरे उपमुख्यमंत्री पवार, महसूल मंत्री थोरात आणि राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.भेट संपल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.या भेटीचा तपशिल देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यपाल महोदय यांना आम्ही राज्यातील परस्थितीची माहिती दिली. खान्देशात झालेला मोेठा पाऊस, झालेले नुकसान आणि राज्यातील धरणांची स्थिती याबाबत माहिती दिली.

विधानपरिषेदच्या जागा रिक्त राहिल्याने सभागृहा चालवण्यात अनेक अडचणी येतात. विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या शिफारशी करुन मोठा कालखंड झाला आहे. त्यामुळे या नियुक्त्या लवकर मार्गी लावा, अशी विनंती राज्यपाल यांना केल्याचे पवार म्हणाले.राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना काही प्रश्न होते, त्याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच १२ सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्याबाबत मी योग्य निर्णय करतो, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगतिले.नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यास राज्यपालांनी अवाजवी विलंब केला आहे, असे मध्यतंरी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. मात्र न्यायालयाच्या टिपण्णीविषयी आम्ही राज्यपाल यांच्याशी काहीही बोलणे झाले नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

या भेटीत १२ राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती करण्यासोबतच सध्या राज्यात असणारी पावसाची परिस्थिती, धरणातील पाणीसाठा यावर चर्चा झाली.राज्यपालांनी १२ जणांच्या या यादीवर कुठल्याही प्रकारचे आक्षेप घेतलेले नाहीत असेही पवार यांनी स्पष्ट केले.

वाचा : १२ जणांच्या यादीत कोणाची नावे


-काँग्रेस: ) सचिन सावंत, २) रजनी पाटील, ३) मुजफ्फर हुसैन, ४)अनिरुद्ध वनकर.

-राष्ट्रवादी काँग्रेस : १) एकनाथ खडसे, २) राजू शेट्टी ३) यशपाल भिंगे, ४) आनंद शिंदे.

-शिवसेना : १) उर्मिला मातोंडकर, २) नितीन बानगुडे पाटील, ३) विजय करंजकर, ४ ) चंद्रकांत रघुवंशी.

Previous articleकेंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला “जळू”
Next articleपंकजाताई…तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात !