राज्यसभा पोटनिवडणूक : काँग्रेसच्या रजनी पाटील विरूद्ध भाजपचे संजय उपाध्याय यांच्यात सामना रंगणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी होणा-या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

महाराष्ट्रासह,पश्चिम बंगाल,आसाम,मध्यप्रदेश आणि तामीळनाडूमधून राज्यसभेच्या रिक्त झालेल्या एकूण सहा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी केली आहे.या पोटनिवडणुकीसाठी येत्या ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मे पासून महाराष्ट्रातून राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे.या रिक्त जागेसाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जम्मू काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रभारी रजनी पाटील यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा केली. महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या या जागेसाठी मिलिंद देवरा,मुकूल वासनिक यांच्यासह रजनी पाटील यांच्या नावाची चर्चा होती.सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.संजय उपाध्याय यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे २२ सप्टेंबर रोजी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील या जम्मू काश्मीरच्या प्रभारी असून,महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांसाठी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.रजनी पाटील या राज्यसभेच्या सदस्या होत्या.१९९६ साली त्या बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.या पोटनिवडणूकीसाठी उमेदवार दिल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला प्रथा आणि परंपरेची आठवण करून दिली आहे.भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेबाबत झालेल्या निर्णयाची थोरात यांनी आठवण करून दिली आहे.महाजन यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. असे थोरात यांनी सांगून,या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देवू नये यासाठी विनंती करू असेही थोरात यांनी सांगितले.या पोटनिवडणुकीसाठी राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रजनी पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या वर्णी विधानपरिषदेवर लागण्याची शक्यता आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम-

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त झालेल्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार असून २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख आहे.राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.या निवडणुकांसाठी १५ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात आली असून,२२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख असून २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे.२७ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

Previous articleराष्ट्रीय महामार्गाला भेगा ; पंकजा मुंडेंच्या ट्वीटनंतर नितीन गडकरींकडून कारवाईचे निर्देश
Next articleफडणवीसांच्या काळातील फाईली काढण्याची वेळ आली आहे : नाना पटोलेंचा इशारा