मुंबई नगरी टीम
मुंबई । माध्यमे,उद्योगपती आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते यांच्यावर बेछूट आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरु आहे.केंद्रातील सरकारने राज्यातील भाजप नेत्यांना ब्लॅकमेलींग करण्याची परवानगीच दिली आहे.अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला, यावेळी बोलताना ते म्हणाले की,देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतक-यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी बेताल वक्तव्ये आणि बेछूट आरोप, स्टंटबाजी करून भाजप नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काल अनंत चतुर्दशी असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाणिवपूर्वक स्टंटबाजी करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला.आम्हाला भाजपच्या कुठल्याही इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.आमचा कोणताही मंत्री दोषी नसल्याने त्यांच्या आरोपांची काँग्रेसला कसलीही भीती नाही.ईडी आणि सीबीआयचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जातोय, हे सारा देश बघतोय.त्यामुळे कोणीतरी ओरडावे आणि आपण त्याकडे लक्ष द्यावे असे करण्याची काहीच गरज नाही.कारण कर नाही त्याला डर कशाला असे पटोले म्हणाले.
किरीट सोमय्यांना त्यांच्या पक्षात किती महत्त्व दिले जाते, हे मला चांगलेच माहित आहे. पण त्यांना जर खरेच भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचारी धेंडांना उघडे करावे. मगच त्यांना खऱ्याअर्थाने जनतेचा पाठिंबा मिळेल.फडणवीस सरकारच्या काळातील काही फाईली काढण्याची वेळ आली आहे.चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही. किती खाल्ले तेही सांगून जावे. मुख्यमंत्र्यांचा स्वभाव गंमत करण्याचा आहे. त्यांच्या पद्धतीने ते बोलले. पण भाजप नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्न पडत आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल असे पटोले म्हणाले.महाराष्ट्राच्या स्थापनेला आता ६० वर्ष झाली आहेत. स्थापनेपासून ते महाराष्ट्राला आघाडीचे राज्य बनवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. या ६० वर्षात काँग्रेस सरकारांनी केलेली कामे आणि भविष्यात महाराष्ट्र कसा घडवायचा आहे, याचा कार्यक्रम घेऊन लवकरच आम्ही गावागावांपर्यंत जाणार आहोत असेही पटोले म्हणाले.