मुंबई नगरी टीम
मुंबई । काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांनी तर भाजपकडून भाजपकडून संजय उपाध्याय यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येते आहे तर भाजपच्या कोअर कमिटीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने याबाबत कोअर कमिटीमध्येच निर्णय घेतला जाईल असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने राज्यातील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या ४ ऑक्टोंबरला पोटनिवडणुक होत आहे.अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज काँग्रेसकडून रजनी पाटील यांनी तर भाजपकडून भाजपकडून संजय उपाध्याय यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील या बहुमताने निवडून येतील,असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.तर पुरेसे संख्याबळ नसलेल्या भाजपने या निवडणूकीत उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासाठी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करू असे म्हटले आहे.भाजपच्या कोअर कमिटीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला प्रतिप्रश्न करुन निवडणूक कशी बिनविरोध होईल ? असा सवाल करीत भाजपने काही तरी विचार करुनच उमेदवारी अर्ज दाखल केला असेल असे फडणवीस यांनी सांगितले.ही निवडणूक लढवावी किंवा नाही याबाबत कोअर कमिटीतच निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले.२३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे.२७ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे.