मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानुसार ग्रामीण भागातील ५ ते १२ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग येत्या ४ ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहेत.शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सने दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जाणार असून,शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरच विद्यार्थी,पालक आणि शाळांना कळवली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात राज्यातील ५ वी ते ८ वी आणि ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स,शिक्षणतज्ज्ञ यांच्या सूचनेनुसार शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.परंतु राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत सध्या कमालीची घट झाल्याने आता राज्यातील बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.त्यानुसार ग्रामीण भागातील ५ ते १२ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती असणे गरजेचे करण्यात आले आहे.शाळा सुरू करताना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सने दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जाणार आहेत. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरच विद्यार्थी,पालक आणि शाळांना कळवली जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.