मुंबई नगरी टीम
खंडवा (मध्यप्रदेश) । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मध्यप्रदेशात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मॅरेथॉन सभा घेऊन मैदान गाजवले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच विकासाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या, हे वास्तव आहे. भाजपच्या उमेदवाराला दिलेले मत हे थेट मोदींना जाणार आहे, त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
खंडवा लोकसभा पोटनिवडणूकीचे भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ खकनार, दर्यापूर, नेपानगर येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय,मंत्री तुलसी सिलावत,जिल्हाध्यक्ष मनोज लधवे, जिल्हा प्रभारी अलोक शर्मा, इक्बाल सिंग गांधी, माजी मंत्री अर्चना सिरसाट आदींसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.एखाद्या ठिकाणी पोटनिवडणूक लागणे ही चांगली बाब नाही. आम्ही त्यातून गेलोय.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब गेल्यानंतर बीडमध्ये पोटनिवडणूक झाली होती,त्यांच्या नेतृत्वाच्या करिश्म्यामुळे प्रीतम मुंडे विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. खंडावा मतदारसंघातही नंदकुमार चौहान यांच्या निधनाने ही निवडणूक लागली आहे.नंदूभैय्या यांना आदरांजली म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यानी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची केवळ देशातच नव्हे तर जगात लोकप्रियता आहे, एका गरीब कुटुंबातून ते पुढे आले, त्यांनी गरिबी जवळून पाहिलीयं, त्यामुळे देशातील प्रत्येक गरीब माणसाला ते आपले वाटतात. गरीबांची जाण असल्याने सर्व सामान्यांसाठी त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, सौभाग्य योजना, उज्ज्वला गॅस, जनधन, किसान सन्मान अशा कितीतरी योजना त्यांच्यामुळेच गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या. कॅाग्रेसला अखेरची घरघर लागली आहे, त्यांचा हात गरीबांसोबत कधी नव्हताच, त्यांना मतदान करू नका तथापि, भाजपच्या उमेदवाराला दिलेले मत थेट मोदींपर्यंत जाणार आहे, त्यामुळे पाटील यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन पंकजा मुंडेंनी यावेळी केले.या मतदारसंघात बंजारा समाज मोठया प्रमाणात आहे, त्यामुळे पंकजाताईंनी याच भाषेत अल्पसा संवाद साधून मतदारांची मनं जिंकली. “तमार छोरिरो चकेन जय सेवालाल! तम मन आशिर्वाद दिने अन म प्रचारेंन आवगी. तमारो मान राकाडी पन मोठे मतेती इ शीट विजयी करो मार विनंती छ. तम मोठे संख्या ती मतदान करतानि आपले उमेदवारेन विजयी करो” असं सांगून विजयाचे आवाहन केले.नेपानगर जि. बुरहानपूर येथे आयोजित भाजपा अनुसूचित जाती तथा प्रबुध्दजन संमेलनात मतदारांना संबोधित करतांना वंचित, पिडित घटकांच्या विकास करण्यासाठी भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आजच्या सर्व सभा हेलिकॉप्टरने झाल्या,ठिक ठिकाणी मतदारांनी, कार्यकर्त्यांनी त्यांचे वाजत-गाजत, फुलांच्या वर्षावात जोरदार स्वागत केले. सभांना मतदारांनी मोठी गर्दी केली होती. सभेच्या सुरवातीला त्यांच्या हस्ते कन्यापूजनही करण्यात आले.