मतं खाण्यापेक्षा ‘वंचित’ने सत्तेचे राजकारण करावं; आठवलेंचा आंबेडकरांना खोचक सल्ला

मुंबई नगरी टीम

मुंबई । वंचित बहुजन आघाडी केवळ मते खाण्यात धन्यता मानत असून त्याने समाजाचे काहीच भले होणार नाही. वंचितने यापुढे सत्तेचे राजकारण करावे, असा खोचक सल्ला रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना दिला. १९९० मध्ये काँग्रेसला सर्व रिपाइं गटाने सहकार्य न करणे घोडचूक होती, असा दावा त्यांनी केला.

माध्यम प्रतिनिधीशी गप्पा मारताना आठवले म्हणाले,१९९० मध्ये शरद पवार काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मी वगळता कोणीही काँग्रेसला सहकार्य केले नाही. सर्व रिपाइं गट तेव्हा काँग्रेससोबत आले असते तर दलित समाजाला ३० टक्के सत्तेत वाटा मिळाला असता.बहुजन समाज पक्षाने (बसप) कायम ब्राह्मणविरोधी भूमिका घेतली. मात्र आता त्यांना त्यांची चूक उमगली आहे. उत्तर प्रदेशातील १३ टक्के ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष करणे कांशीराम यांची ऐतिहासिक चूक होती, असा दावा आठवले यांनी केला. २००७ मध्ये बसपने युपी विधानसभेला ८४ सवर्ण उमेदवार दिले होते. रिपाइं यावेळी १०० पेक्षा अधिक सर्वण उमेदवार देणार आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.दादर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा ७५० कोटींचा खर्च १२५० कोटीवर गेला आहे. तसेच २०२२ मध्ये असलेली स्मारकाची काम पूर्ण करण्याची तिथी २०२४ पर्यंत गेल्याचे ते म्हणाले. तिसऱ्या कोरोना लाटेची भीती कायम असून यंदा महापरिनिर्वाण दिनी भिमानुयायांनी चैत्यभूमीला न येता घरुन अभिवादन करावे, अशी सूचना आठवले यांनी केली.पुणे, पनवेल आणि उल्हासनगर येथे रिपाइंचा उपमहापौर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइं व भाजप युती असेल. मुंबई महापालिकेत आम्ही १०० जागा जिंकून सत्तेत येणार असून रिपाइंला उपमहापौर पद प्राप्त होईल, असा दावा आठवले यांनी केला.

पश्चिम बंगाल विधानसभेला भाजपने आम्हाला बरोबर घेतले असते तर भाजपचा इतका दारुण पराभव झाला नसता असेही आठवले यावेळी म्हणाले.अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना तुरुंगात न टाकता व्यसनमु्क्ती केंद्रात पाठवा.माझे मंत्रालय तसा कायदा करत आहे अशी माहिती देतानाच रिपाइं गटांचे एकीकरण काळाची गरज आहे. पण प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय एकीकरण अपूर्ण आहे. त्यांनी अध्यक्षपद घ्यावे अशी ऑफरही त्यांनी यावेळी दिली.9 जुलै २०२२ रोजी दलित पँथरच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असून या संघटनेचे पुनरुज्जीवन होणे गरज आहे त्यासाठी रिपाइं प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले.

Previous articleक्रांती रेडकर यांच्या बहिणीवर ड्रग्जची केस ? समीर वानखेडे उत्तर द्या-मलिकांचे ट्विट
Next articleएसटी कर्मचा-यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत