विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी संजय केनेकर विरूद्ध डॉ. प्रज्ञा सातव यांच्यात लढत

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या २९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून, या निवडणूकीत भाजपचे उमेदवार संजय केनेकर विरूद्ध काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यात लढत होणार आहे.भाजपचे संजय केनेकर यांनी आज उमेदवार अर्ज दाखल केला तर काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या २९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून भाजपने औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांना तर काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. आज भाजपचे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी भाजपचे नेते उपस्थित होते.काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावाची आज घोषणा केली आहे.त्या उद्या ( मंगळवारी ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.या निवडणूकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे.काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याने या निवडणूकीत भाजप चमत्कार करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडून येणा-या उमेदवाराचा कालावधी हा जुलै २०२४ पर्यंत असणार आहे.

Previous articleरझा अकादमीवर बंदी घालून त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने अटक करा
Next article..तर एसटीच्या एमडींच्या कार्यालयाला टाळे ठोकू ; प्रविण दरेकर यांचा इशारा