मुंबई नगरी टीम
मुंबई । जागतिक वित्तीय केंद्र जेव्हा मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्यात आले तेव्हा महाराष्ट्रातले भाजप नेते का गप्प होते, असा सवाल शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई केला.जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले ते उद्योग पळवण्यासाठीच आले होते काय,अशी विचारणाही देसाई यांनी भाजप नेत्यांना केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आल्या होत्या, त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली होती. तसेच मुंबईतील उद्योग पश्चिम बंगालमध्ये नेण्यास आघाडी सरकार मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.त्याला प्रत्युत्तर देताना देसाई यांनी भाजपला अनेक सवाल केले. आज मुंबईमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री आले आहेत, त्यावर भाजप नेते का बोलत नाहीत,असा प्रश्न त्यांनी केला.यापूर्वी अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते,तेव्हा भाजप नेते का गप्प होते, योगी यांनी मुंबईतून किती उद्योग पळविले असा प्रश्न विचारून तेव्हा भाजप नेते योगी साठी का पायघड्या घालत होते असा जाब त्यांनी विचारला.
देसाई म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने मागच्या दोन वर्षात ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून आणली आहे. नुकत्याच दुबई मध्ये झालेल्या उद्योगांच्या मेळाव्यात राज्याला १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे,असे सांगून आमचा उद्योग पळण्यावर विश्वास नसून परदेशातून गुंतवणूक आणण्याकडे आहे,असेही देसाई म्हणाले.पर्यावरण मंत्री मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी भाजपला पोटदुखी आहे अशी टीकाही देसाई यांनी केली. शिवसेना पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रात मोठा होत आहे, त्याचा फटका भाजपला बसतो आहे. त्यामुळे भाजप वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याचे देसाई म्हणाले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि युवासेना अध्यक्ष व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट राजकीय मैत्री संदर्भात होती,असे सांगतानाच जागतिक वित्तीय केंद्र मोदी सरकारने मुंबईतून गुजरात मध्ये हलवले आहे, तरी महाविकास आघाडी नवे वित्तीय केंद्र मुंबईत उभा करेल, असा दावाही देसाई यांनी केला.