शिवसेना -काँग्रेस एकत्र येतील हे कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते ;पण खरे चाणक्य शरद पवारच!

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस ममता बॅमर्जी यांच्या सोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटत आहे. परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे शरद पवार चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला ठणकावून सांगितले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते तशीच परिस्थिती या देशात होणार आहे असेही मलिक यांनी स्पष्ट केले. बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम पवार करतील. कोणत्याही पक्षाला याच्यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे यादृष्टीने पवार काम करत आहेत असेही मलिक यांनी सांगितले. या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्यापध्दतीने युपीएच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला या देशात ममता बॅमर्जी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामुहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल असेही मलिक यांनी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी या दोन दिवसाच्या दौ-यावर असताना त्यांनी पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात मोदी सरकारच्याविरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यावर पवार यांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे असेही मलिक म्हणाले.

खोटं बोलण्यात भाजपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते असा टोला मलिक यांनी लगावला.इतर लोकं खोटं बोलतात हे भाजपने बोलणं हास्यास्पद असून खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपच्या लोकांचा उद्योगच आहे असा थेट आरोपही मलिक यांनी केला. जे स्वतः खोटं बोलण्याचा उद्योग करतात त्यांना दुसर्‍यांकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही अशा शब्दात मलिक यांनी भाजपला सुनावले आहे. गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी होण्याची कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी देशाची राजधानी होऊ शकत नाही मुंबई हीच देशाची आर्थिक राजधानी राहिल हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले. गुजरातच्या आनंदीबेन आल्या होत्या. आता पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री आले आहेत. प्रत्येक लोक येतात परंतु कधी कटकारस्थान करुन महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे काम कुणी केले नाही असेही मलिक म्हणाले.सात वर्षात मोदी सरकार आल्यानंतर उद्योग व आस्थापना मुंबईमध्ये न होता गुजरातच्या गांधीनगरमध्ये कसे होतील. मोदीसाहेबांचे आदेश व देवेंद्र फडणवीस यांचा होकार यामुळे महाराष्ट्राचे बरेच नुकसान झाले आहे त्यामुळे जे लोक बोट दाखवत आहेत त्याबाबतीत त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा चिमटाही नवाब मलिक यांनी काढला.महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. व्यापार उद्योगासाठी पहिली प्राथमिकता महाराष्ट्राला देत आहेत हेही आवर्जून मलिक यांनी नमूद केले.

Previous articleजागतिक वित्तीय केंद्र गुजरातमध्ये हलवण्यात आले तेव्हा भाजपचे नेते गप्प का होते ?
Next articleविधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनात आवाजी मतदानाने होणार