विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनात आवाजी मतदानाने होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । येत्या २२ डिसेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनातच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल आणि अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल,असे सांगतानाच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने होईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून विधानसभेचे अध्यक्षपद रिक्तच आहे.गेल्या दोन अधिवेशनातही यावर निर्णय झाला नाही.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही अध्यक्षपदासंदर्भात महाविकास आघाडी सरकारला पत्र लिहिले होते.नुकत्याच झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतही अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली नसल्याने येत्या २२ डिसेंबर पासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार की नाही यावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता.अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांची कालावधी लागतो त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही.मात्र येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल. आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही.विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे.महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही असेही पटोले यांनी सांगितले.

अमरावती दंगलीप्रकरणी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते,भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केली.त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर अमरावती दंगलीचे खापर फोडणे चुकीचे आहे.राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे व असा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे. राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्याचा फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, भाजपाने देशासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असेही पटोले म्हणाले.

Previous articleशिवसेना -काँग्रेस एकत्र येतील हे कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते ;पण खरे चाणक्य शरद पवारच!
Next articleनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौ-यावर