मुंबई नगरी टीम
मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली.त्यानंतर राज ठाकरे आता पुन्हा कामाला लागले आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक पार पडली.या बैठकीत राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर दिली.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला ६ डिसेंबरपासून सुरुवात होईल.राज ठाकरे ६ डिसेंबरला पुण्यात जाणार आहेत. तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर १४ डिसेंबरपासून राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरु होणार आहे. ते १४ तारखेला औरंगाबादला दाखल होतील. त्यानंतर १६ डिसेंबरला पुण्यात पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.आतापर्यंत मनसेने सर्व निवडणुका या स्वबळावरच लढल्या आहेत. आता देखील तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. मात्र पुढे काय होईल हे आता सांगता येत नाही.मनसेची पुढची भूमिका ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच ठरवतील,असे नांदगावकर यांनी सांगितले.