पराभवानंतर महाविकास आघाडीकडून भाजपवर घोडेबाजाराचा आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानपरिषदेच्या निवडणूकांच्या निकालाची आज घोषणा करण्यात आली.विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघातून माजी मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे उमेदवार मंगेश देशमुख यांचा तर अकोला,वाशिम,बुलढाणा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा मोठ्या फरकाने पराभव केल्याने राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार करुन विजय मिळवला आहे असा आरोप आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे मुंबईतून राजहंस सिंह,धुळे-नंदूरबार मतदारसंघातून अमरिश पटेल,तर मुंबईतून शिवसेनेचे सुनिल राऊत आणि कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसचे सतेज पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत.सहा मतदार संघा पैकी नागपूर प्राधिकारी मतदार संघ आणि अकोला,वाशिम,बुलढाणा या ठिकाणी मतदान घेण्यात आले होते.या निवडणूकीची मतमोजणी आज करण्यात आली.नागपूर मध्ये काँग्रेसला मतदानाच्या एक दिवस अगोदर उमेदवार बदलल्याचा मोठा फटका बसला असल्याचे स्पष्ट झाले.नागपूर मध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, डॉ. रवींद्र भोयर केवळ १ तर काँग्रेसचे मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली तर ५ मते बाद ठरली. २७५ मतांचा कोटा भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.अकोला विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांना ४४३ तर शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली एकूण ३१ मते बाद ठरली.या मतदार संघातून सलग तीन वेळा विजयी झालेले शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभवाचा सामना करावा लागला.या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचा दावा करण्यात येत असतानाच महाविकास आघाडीने भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाकडून घोडेबाजार

विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार करुन विजय मिळवला आहे. मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करून पक्ष या पराभवावर आत्मचिंतन करेल, असे काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता. भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. भाजपाकडे ९० मते जास्त असतानासुद्धा मतदारांना घेऊन त्यांना राज्याबाहेर पळावे लागले. त्यांना घोडेबाजार करावा लागला, हा खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव आहे. लोकांमधून होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव केला.निवडणुकीत हार जीत होतच असते, काँग्रेस व मित्रपक्षांनी विजयासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले मात्र विजय मिळवण्यात आम्ही कमी पडलो,आम्ही कुठे कमी पडलो ? याचे आत्मपरिक्षण करू. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी काम केलेल्या काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लोंढे यांनी आभार मानले.

महाविकास आघाडी सरकारचे अपयश सिध्द
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

भाजपाला महाराष्ट्रातील जनतेचा जनाधार असल्याचे विदर्भातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे आणि ठाकरे सरकारवर जनता पूर्णपणे नाराज असल्याचे चित्र या निकालाच्या माध्यमातून दिसून आल्याचे सिद्ध झाले आहे. जनतेने भाजपावर दाखविलेल्या विश्वा्साला आम्ही तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.

नागपूर आणि अकोला विधान परिषद निवडणुकांत भाजपाने मिळवलेल्या विजयानंतर ते प्रसारमध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत झालेल्या निवडणुकांत भाजपा प्रथम क्रमांकावर होती. परंतु जनतेमध्ये हा संदेश गेलाय की सरकार चालवण्याच्या क्षमतेचे तिन्ही पक्षाची लोक नाहीत. सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय याचेसुद्धा प्रत्यंतर या निकालाच्या माध्यमातून दिसून येत आहे. विदर्भातल्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला आहेच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेता असतानाही महाराष्ट्रातील जनतेमध्ये जात आहेत व त्यांची यापूर्वीची पाच वर्षांची कारकीर्द होती ती कारकीर्द आणि आताची कारकीर्द यामधील तुलनात्मक विचारसुद्धा जनतेने केला आणि त्याचे पडसाद निकालातून उमटले आहेत, असेही दरेकर यांनी सांगितले.दोन्ही जागांवरच्या विजयाने महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे की, महाराष्ट्रातील जनता आजही भाजपासोबत आहे. अकोल्याची शिवसेनेची गेली १५ वर्षे असणारी जागासुद्धा भाजपाने हिसकावून घेतली आहे. तिथल्या मतदारांनी भाजपावर विश्वास दाखवून राज्याचा जनाधार भाजपाच्या बाजूने असल्याचे दाखवले.जनतेमध्ये असणारी नाराजी तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये सरकार चालवण्याची अकार्यक्षमता आणि त्याच्यामुळे ते अयशस्वी झाल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

Previous articleशाहू – फुले – आंबेडकर यांच्या समाजाला पुढे नेण्याच्या दुरदृष्टीच्या सुत्रावरच पक्ष काम करतोय
Next articleहिंमत असेल तर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने घ्या