शाहू – फुले – आंबेडकर यांच्या समाजाला पुढे नेण्याच्या दुरदृष्टीच्या सुत्रावरच पक्ष काम करतोय

मुंबई नगरी टीम

मुंबई | शाहू – फुले – आंबेडकर यांची दूरदृष्टी समाजाला पुढे नेण्याची होती त्यांच्या या दुरदृष्टीच्या सुत्रावरच आमचा राष्ट्रवादी पक्ष काम करतोय असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

आज नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमचा पक्ष एका विचाराने देशात आणि राज्यात काम करतोय. बांधिलकी असलेले कार्यकर्ते पक्षात आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी झटणारा पक्ष आहे असेही शरद पवार म्हणाले. लिहिणारे, वाचणारे, अभ्यास करणारे, लिखाण करणारे लोक सध्या फार आहेत. दिनदुबळ्यांचं, पददलितांचं, वंचितांचं दुःख ऐकून आमच्या पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होतो असेही पवार यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी पुढचा विचार त्यावेळी केला होता. बाबासाहेबांची दृष्टी घटनेच्या पुढची होती. देशातील मोठया धरणातून शेती व वीज निर्मिती केली पाहिजे हा विचार त्यांनी अगोदर मांडला होता याची माहितीही त्यांनी दिली. समाजकारण, राजकारण बदलत आहे परंतु महात्मा फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे असेही पवार म्हणाले.आपल्या भाषणात शरद पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. तर इतर घटनांचा उहापोहही यावेळी केला.

वंचिताचा… महिलांना हक्क मिळवून देणार्‍या.. कर्मयोग्याचा वाढदिवस – अजित पवार

पवार यांचा वाढदिवस म्हणजे… वंचिताचा… महिलांना हक्क मिळवून देणार्‍या… कर्मयोग्याचा वाढदिवस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारसाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.प्रत्येक कार्यक्षेत्रावर पवार यांचा ठसा आहे. या व्यक्तिमत्वाला हिमालयाची उंची आहे. पवारसाहेब आपली प्रेरणा आणि स्फूर्ती आहे असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

ही किमया फक्त पवारसाहेबच करू शकतात – प्रफुल पटेल

दिल्लीत पवार यांचा ७५ वा वाढदिवस पार पडला त्यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधानांपासून सर्वच लोक आपले राजकीय मतभेद विसरत उपस्थित राहिले होते. एवढ्या लोकांना एका छताखाली आणणे सोपे नाही ही किमया फक्त पवारसाहेब करू शकतात आणि हीच त्यांची खरी कमाई आहे असे खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले. कृषीमंत्री असताना पवार यांनी जे काम केले त्या कामाची आठवण काढत आजही देशातील शेतकरी पवारसाहेबांकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे असेही पटेल म्हणाले.

अडथळ्यांना भिवून अडखळणे, या पावलांना पसंत नाही…!!- जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाखाली शरद पवार यांनी हे कुटुंब तयार केले आहे. भावनांच्या धाग्याने हा परिवार त्यांनी गुंफला आहे.शरद पवार या चंद्राच्या चांदण्याने कित्येक आयुष्य प्रकाशमान करून टाकले आहे अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले विचार मांडले. अनेक जण म्हणतात पवारसाहेबांचं राजकारण हे अप्रत्याशित आहे, त्यांचा काही नेम नाही… पण त्यांचा नेम इतका अचूक असतो की त्यांनी घेतलेल्या निर्णयाने एक सामाजिक परिवर्तन घडतं उदाहरणार्थ मराठवाडा विद्यापीठ नामांतर, महिला आरक्षण, महाविकास आघाडी असेही पाटील म्हणाले.

पवार यांचं आयुष्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे, जेव्हा आपल्याला वाटतं की मार्ग सापडत नाही, अडचणींचा विळख्यात आपण सापडलोय… तेव्हा पवारसाहेबांचं चित्र डोळ्यासमोर आणलं की आपल्याला नक्कीच लढण्याची जिद्द मिळते असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. आज राज्यातील जनता आणि कार्यकर्ते व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पहात आहेत. माणसं कशी जोडायची याचा आदर्श पवार यांनी घालून दिला आहे. पवार यांच्या विचारांची शिदोरी आमच्याकडे आहेत. विचारांचं धन वाढवण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात पहिल्या शनिवारी एकत्र बसून चर्चाविनिमय करावा त्यासाठी तिथे असणाऱ्या सेवादलाच्या कार्यकर्त्याला सोबत घ्यावे. एक जानेवारीपासून जनता दरबार भरवला जाणार असल्याचे सांगतानाच तसेच संपर्क मंत्र्यांनी जिल्हयात जनता दरबार घेण्याची सूचना पाटील यांनी केली. यापुढे जो क्रियाशील कार्यकर्ता असेल त्यालाच पक्षाचे तिकिट देणार आहे. विशेषतः ज्याने पक्षासाठी खास्ता खाल्ल्या आहेत अशा आणि जास्तीत जास्त युवक व महिलांचा यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाबाबत कोर्टाने स्थगिती दिली आहे. जाणीवपूर्वक सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. जोपर्यंत ओबीसींना घेऊन निवडणूका होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका अशी भूमिका पक्षाची असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सत्तारूढ आणि हे पाहुणे (ईडी) एकत्र आहेत का अशा पध्दतीने केंद्रीय यंत्रणा काम करत आहेत असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. ईडी म्हणजे काय हे पारावर बसलेल्या लोकांनाही आता कळू लागले आहे असा उपरोधिक टोलाही पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्रात सूडाचे राजकारण कधी झाले नाही. विरोधकांना सन्मानाने वागवायचे हा विचार यशवंतराव चव्हाण यांनी दिला आहे. परंतु सध्या ही परिस्थिती वेगळी असल्याचे पाटील म्हणाले. भाजपाला शेतकऱ्यांसमोर, त्यांच्या लढयासमोर नतमस्तक व्हावं लागलं इतकं मोठा लढा शेतकऱ्यांनी दिला आहे. भारतातील शेतकरी यावेळी जिंकला आहे असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी दिव्यांग योजना राज्यात आजपासून सुरू करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.पंतप्रधान ज्याचं बोट धरून राजकारण शिकले त्या नेत्याच्या छत्रछायेखाली काम करण्याची संधी मिळाली आहे असेही पाटील म्हणाले.

 

आपला योध्दा या वैचारिक लढाईत नक्की जिंकेल – नवाब मलिक

देशात वैचारिक लढाई उभारण्याची गरज असून आपला योध्दा या वैचारिक लढाईत नक्की जिंकेल आणि आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात पवार यांच्या नेतृत्वाखाली जर सरकार बनत असेल तर देशातही पवारसाहेबांच्या विचारांचे सरकार निर्माण होईल अशी आशाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली. पवार यांच्या मुळे माझी ओळख देशात आणि राज्यात निर्माण झाली असल्याची प्रामाणिक कबुलीही मलिक यांनी दिली.
पवार यांच्यासाठी आपल्याला एक संघर्ष तयार करायला हवा. देशातील जनता आपल्याकडे आशेने बघत आहेत असेही मलिक म्हणाले.
महाराष्ट्रात समतामुलक समाज निर्माण व्हावा या विचाराचे पवारसाहेब आहेत. तुम्ही योध्दा आहात तुम्हीच हे चक्रव्यूह भेदू शकता असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.

यावेळी एनसीपी अ‍ॅपचे उद्घाटन शरद पवार यांनी केले. डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी आपले विचार मांडले. पवार व प्रतिभा पवार यांचा एकत्रित सत्कार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतील ‘शरद पवार माझ्या शब्दात’ या निबंध पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यावेळी पवार यांच्या जीवनावरील लघुपट दाखवण्यात आला. महाराष्ट्र युथ कार्निव्हल लोगोचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रतिभा पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,खासदार डॉ. अमोल कोल्हे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार माजिद मेमन, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक सेलचे जयदेव गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, मनपाच्या गटनेत्या राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleपंकजाताईंनी कामगारांसोबत काम केले अन् भाजी – भाकरीही खाल्ली !
Next articleपराभवानंतर महाविकास आघाडीकडून भाजपवर घोडेबाजाराचा आरोप