मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल नियमावली जाहीर करून कडक निर्बंध लागू केले असतानाच,वाढत्या कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.राज्यातील जनतेने कोरोनाचे नियम पाळले नाही तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबई,पुणे सारख्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शिवाय ओमायक्रॅानचे रूग्णही वाढताना दिसत आहे.संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने काल रात्री कडक निर्बंध लागू केले आहेत.त्यानुसार पर्यंटन स्थळावर जमावबंदी आदेश लागू केले आहेत.तर सांस्कृतिक,राजकीय आणि लग्नसोहळ्यात ५० जणांची उपस्थिती राहिल असा नवा आदेश जारी केला आहे.अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे.या निर्बंधानंतर राज्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जनतेला गंभीर इशारा दिला आहे.राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम लोकांचे आहे.लोकांनी नियम पायदळी तुटवडे तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्याच्या परिस्थितावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर राज्यात जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले.मागील लॉकडाऊनमध्ये लोकल आणि शाळांवर काही निर्बंध लावले होते.त्या सर्व गोष्टींचा विचार करता आता लॉकडाऊनची स्थिती येते आहे असे सांगतानाच हा लॉकडाऊन कधी करायचा हा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.