मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरु लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा ४ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसा निर्णय या महानगरपालिकांनी आज जारी केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकांनी शाळांबाबत आज निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील १० वी आणि १२ वीचे वर्ग वगळता अन्य असणाऱ्या सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमांच्या शाळा प्रत्यक्ष अध्ययनासाठी बंद ठेवून ऑनलाई पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहेत.ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण होऊ नये यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते नववी आणि अकरावी यांच्या शाळा ४ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. खासगी शाळाही पात्र असणाऱ्या १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी त्यांना शाळेत बोलवता येईल असेही मुंबई महापालिकेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान १४ मार्च २०२० पासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ४ आॅक्टोबर २०२१ पासुन टप्प्याटप्प्याने १ ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता परत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मेट्रो शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी इतर विभागातील शाळा सुरुच राहणार आहेत, अशी भूमिका शिक्षण विभागाने सोमवारी स्पष्ट केली.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. मुंबई महानगर क्षेत्र वगळता शाळा बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. भविष्यात रुग्ण वाढल्यास स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.