मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी कठोर निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे पाचपर्यँत नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून पहाटे पाच ते रात्री ११ या दरम्यान पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. संचारबंदीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.निर्बंध व नियम १० जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील.
शासकीय कार्यालयात अभ्यागताच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. व्यायामशाळा, तरणतलाव ,स्पा,ब्युटी सलून बंद राहणार असून हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र हेअर कटिंग सलून दुकान रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवावी लागणार आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णवाढ ही तिसऱ्या लाटेची सुरुवात मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृती दल तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांच्या सहीने काल रात्री उशिरा यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना नियमित वेळेत रेल्वे, बस सारख्या सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करता येणार आहे.
लग्नसमारंभ सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम
लग्नसमारंभ,सामाजिक, सांस्कृतिक समारंभासाठी जास्तीत जास्त ५० जणांना तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांनाच एकत्र येता येईल. प्रार्थना स्थळांवर कोणतेही कडक निर्बंध नाहीत. शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील.
अभ्यागतांना प्रवेश बंदी
शासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती लागू करण्यात आली असून वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. दोन लस घेतलेल्या व्यक्ती खासगी कार्यलयात जाऊन काम करू शकणार आहेत.
रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू
रेस्टॉरंट आणि खाद्यगृहे त्यांच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच तिथे प्रवेश देता येणार आहे.रेस्टॉरंट देखील रात्री १० ते सकाळी ८ या काळात बंद ठेवावी लागणार आहेत.होम डिलिव्हरी मात्र आठवडयातील सर्व दिवस सुरू ठेवता येईल.
नाट्यगृह , सिनेमा थिएटर त्यांच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मनोरंजन पार्क, उद्याने, क्रीडांगण, प्राणीसंग्रहालये,म्युझियम,किल्ले तसेच पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
मॉल्स सुद्धा५० टक्के क्षमतेने सुरू
शॉपिंग मॉल्स,मार्केट संकुलात देखील ५० टक्के क्षमतेनेच प्रवेश देण्यात येणार आहे.पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच तिथे प्रवेश देण्यात येईल.मॉल्स रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत बंद ठेवावे लागणार आहेत.