मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ मार्चपासून सुरू होणार असून, ते २५ मार्च पर्यंत चालणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.तर येत्या ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मुंबईत २८ मार्चपासून सुरू होणार असल्याची चर्चा होती मात्र आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे अधिवेशन येत्या ३ मार्चपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ मार्च पर्यंत चालणार आहे.या वर्षाचा अर्थ संकल्प ११ मार्च रोजी सादर करण्यात येणार असून,आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार,संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.