मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली । महाराष्ट्रामध्ये कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांना भेटून केली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही याबाबत सकारात्मक दृष्टीकोन असल्याची माहितीही रेड्डी यांनी दिल्याने कुसुमाग्रज जयंतीच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
मराठी भाषा मंत्री देसाई यांनी मराठी भाषा ही अभिजात असल्यासंदर्भातील सविस्तर माहिती यावेळी दिली. यासोबतच मराठी भाषेबद्दल सुलभ संदर्भ म्हणून आतापर्यंत झालेल्या वाटचालीची पुस्तिका, आणि निवेदन केंद्रीय मंत्री रेड्डी यांना दिले.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतचे निकष, अटींची पूर्तता होत असल्याचे केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही याबाबत सकारात्मक दृष्टीकोन असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकार यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घेणार असल्याचे रेड्डी यांनी यावेळी सांगितले.देसाई यांनी केंद्रीय मंत्री रेड्डी यांना कुसुमाग्रज जयंती निमित्त साजरा केला जाणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. याचदिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची घोषणा करण्याचीही मागणी केली.यामुळे महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेला आणि सर्वच मराठी प्रेमींना आनंद होईल,असेही देसाई यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आता जनअभियानाचे रूप प्राप्त झाले असल्याचे देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले असल्याची माहितीही रेड्डी यांना देसाई यांनी दिली.यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हजारो पोस्ट कार्डसच्या माध्यमातूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी करणारी पत्रे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाठविली असल्याची माहिती देसाई यांनी दिली.