मुंबई नगरी टीम
शिर्डी । राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार स्वत: कडे घेण्याचा घेतलेला निर्णय घटनाबाह्य असून,सरकारला असे करता येत नसल्याचे सांगतानाच,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,भाजपा,शिवसेना हे चोरांचे सरकार असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. शिर्डी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य सरकारने काल विधानसभेत मंजूर केलेले हे विधेयक घटनाबाह्य आहे.प्रशासकाच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा कुठलाही अधिकार राज्यघटनेने दिला नाही,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना हे चोरांचे सरकार असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली.आरक्षण प्रभागरचना ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे घेतले आहेत.निवडणूक आयोगाकडे आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाहीत. मात्र, राज्य सरकारचा कुठलाही निर्णय मान्य करण्याच बंधन निवडणूक आयोगावार नाही. त्यामुळे आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे असेही आंबेडकर म्हणाले.
राज्य सरकारकडून अपप्रचार केला जातोय की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केलंय. मात्र,हे खोटं असून राज्य सरकार अन केंद्र सरकारमुळे हे आरक्षण रद्द झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ओबीसींचा इम्पीरिकल डेटा मागितला होता, तो न दिल्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. या चार पक्षांना मतदान देणे बंद करून ओबीसींनी सत्ता हातात घेतली पाहिजे तरच आरक्षण टिकेल असेही ते म्हणाले.