मुंबई नगरी टीम
मुंबई । निधी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला आज अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत समाचार घेतला.कोणतेही सरकार चालवायचे आणि टिकवायचे आणि पुढे न्यायचे म्हटले तर भेदभाव करून चालणार नाही. सरकारने भेदभाव केला तर चार दिवसही सरकार चालणार नाही असे स्पष्ट करून,सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात.पण काही तरी सांगून कुठे तरी आगीत काडी घालण्याचे काम करू नका, असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक निधी घेतला असून शिवसेनेला सर्वात कमी निधी दिल्याची टीका केली होती. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आकडेवारी सादर करत हा दावा फेटाळून लावला.निधी वाटप करताना शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसही भेदभाव करत नाही.अर्थखात्याकडची रक्कम वेतन आणि निवृत्तीवेतनावर आणि कर्जाचे व्याज भरण्यावर जाते. आणि हे सर्व घातले राष्ट्रवादीच्या नावावर असे सांगून,असं कुठं असतं का ? असा रोखठोक पवार यांनी विरोधकांना विचारला.सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात.पण असले काही तरी सांगून कुठं तरी आगीत काडी घालण्याचं काम करू नका, असा टोला पवार यांनी विरोधकांना लगावला.शिवसेनेला एवढे लाख कोटी,राष्ट्रवादीला एवढे लाख कोटी आणि काँग्रेसला एवढे लाख कोटी दिले. सरकार कोणत्याही पक्षांचे असले तरी असा निधी देता येत नाही आणि दुजाभाव करता येत नाही.एखादे खाते कुणाकडे असेल तर त्या खात्याचा निधी त्या राजकीय पक्षाचे वैयक्तिक नसतात असेही त्यांनी स्पष्ट केले.राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे.त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील जनतेवर करवाढीचा कोणताही बोजा न देता कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योगक्षेत्राच्या विकासाच्या पंचसुत्रीमुळे राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल. अर्थसंकल्पात घेतलेल्या,प्रत्येक निर्णय आणि केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सर्वशक्तीनिशी केली जाईल, अशी ग्वाही देतानाच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदारांचा स्थानिक विकासनिधी पाच कोटी करण्याची महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.
कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारने चार टक्क्यांपर्यंत कर्ज घ्यायला मुभा दिली होती.त्यानुसार १ लाख २० हजार कोटींपर्यंत कर्ज घेता येत होते,तरीही राज्य सरकारने ९० हजार कोटी कर्ज घेतले. केंद्रसरकारचीही कोरोना काळात ओढाताण झाली.त्यांनी एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या साडे सहा टक्के कर्ज घेतले, तर राज्याने केवळ तीन टक्केच कर्ज घेतले, असेही पवार यांनी नमूद केले.नैसर्गिक संकटासाठी १४ हजार कोटी, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देण्यासाठी ७ हजार कोटी तर एसटी महामंडळासाठी २ हजार कोटी असे २३ हजार कोटी आकस्मिक खर्च करण्यात आलेला आहे असेही पवार म्हणाले.राज्याची महसुली जमा २०२१-२२ रोजी ३ लाख ६८ हजार ९८६ कोटी होती. यदांच्या अर्थसंकल्पात महसुली वाढ ४ लाख ३ हजार ४२७ कोटी एवढा अंदाजित केला. तसेच कर महसुलातही आठ टक्क्यांची वाढ अपेक्षित धरली आहे. मागच्या वर्षी कर महसूल २ लाख ८५ हजार ५३३ कोटी होता तर यावर्षी तो ३ लाख ८ हजार ११३ कोटी एवढा अंदाजित केलेला आहे.राजकोषीय तूट ही महसूली तूटीच्या ०.६८ टक्के आहे.रोजकोषीय तूट हे स्थूल उत्पन्नाच्या प्रमाणात तीन टक्क्यांपेक्षा जास्त असू नये असा प्रयत्न राज्याने केला आहे. हे प्रमाण अडीच टक्के एवढे अंदाजित केलेले आहे असेही पवार म्हणाले.महाविकास आघाडीच्या सरकाराचा अर्थसंकल्प सादर करताना सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे असा प्रयत्न केला असे सांगतानाच अर्थखात्याकडून वेतन व निवृत्ती वेतन आणि कर्जाच्या व्याजापोटी १ लाख ४१ हजार २८८ कोटी खर्च केले जात आहेत असेही पवार यांनी स्पष्ट केले.
कोरोना संकटात महाविकास आघाडीच्या सरकारने नागरिकांच्या जीवाला प्राधान्य दिले. कोरोनामध्ये काही निर्बंध घातले.मात्र आता अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.काहींनी फार काळ निर्बंध घातले म्हणून टीका केली होती, मात्र त्यावेळची ती गरज होती.महाराष्ट्र ही संताची भूमी आहे.संत ज्ञानेश्वरांच्या भावंडांच्या विविध ठिकाणाहून पालख्या निघत असतात. संत ज्ञानेश्वरांच्या ७२५ व्या समाधी वर्षानिमित्त या संताच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी जो काही निधी लागेल, राज्यसरकार देईल, अशी घोषणाही पवार यांनी केली. आमच्या काळात विदर्भात अधिवेशन घेणे राहून गेले.कोरोनामुळे नागपूरमध्ये अधिवेशन घेऊ शकलो नाही.मात्र पुढील काळात नागपूरमध्ये अधिवेशन घेतले जाईल असे जाहीर करताना विरोधकांनी वैधानिक महामंडळे बंद करुन विदर्भावर अन्याय केला असा बागुलबुवा केला असला तरी प्रत्यक्षात हा मुद्दा साफ चुकीचा आहे असे पवार यांनी स्पष्ट केले. उलट विदर्भाला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या तुलनेत बराच निधी दिला असल्याचेही पवार यांनी सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले.आर्थिक ओढाताण असतानाही सर्वांना न्याय देणारा अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पाला सर्वांची साथ मिळेल अशी अपेक्षाही पवार यांनी शेवटी व्यक्त केली.