वीज तोडणी थांबवली : पुढील ३ महिने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । शेतक-यांच्या कृषिपंपांची वीज तोडणीचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला.सभागृहात झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले.वीज पुरवठा खंडीत केलेल्या शेतक-यांची वीज जोडणी पुर्ववत करण्यात येवून,पुढील ३ महिने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असा दिलासा देतानाच,थकबाकीपोटी शेतक-यांची वीज तोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली.

शिवसेनेचे सदस्य बालाजी कल्‍याणकर यांनी शेतक-यांच्या वीजपंपाची जोडणी तोडण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उचलून धरत सत्ताधा-यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला.यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.उर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी शेतक-यांना दिलासा देत वीज पुरवठा खंडीत केलेल्या शेतक-यांची वीज जोडणी पुर्ववत करण्यात येईल अशी घोषणा केली. तसेच पुढील ३ महिने या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.थकबाकीपोटी शेतक-यांची वीज तोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय घेण्यात येत असल्‍याचे त्यांनी सांगितले.मात्र सध्या महावितरणची आर्थिक परिस्‍थिती गंभीर असून ग्राहकांनी देखील थकित बिले भरावीत असे आवाहनही उर्जामंत्र्यांनी केले. वीज बिलाच्या थकीत रक्कमेची परतफेड ही ६ मासिक हप्त्यांऐवजी १२ मासिक हप्त्यात करण्याची लवचिकता देण्याबाबत सुचना देण्यात आल्या असल्‍याचेही ते म्‍हणाले. महावितरणच्या विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे सुमारे ६४ हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली असल्‍याचे राउत म्‍हणाले.

सध्या महावितरणची थकबाकी २०२० अखेर ५९ हजार १४९ कोटींवर गेली आहे.टाळेबंदी असतानाही अखंड वीज पुरवठा केला गेला.जगात आणि देशात कोळशाची टंचाई असल्याने अन्य राज्यात भारनियमन झाले मात्र महाराष्ट्रात भारनियमन होऊ दिले नाही अस दावा त्यांनी केला.महावितरणची थकबाकी सातत्‍याने वाढतच चालली आहे.महावितरण कंपनीकडे घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे मार्च २०२१ अखेर ७ हजार ५६८ कोटी इतकी थकबाकी होती. शहरी व ग्रामीण स्वराज्य संस्था यांच्याकडील पथदिवे व पाणीपुरवठा योजना यांची थकबाकी जानेवारी २०२२ अखेर ९ हजार ११ कोटी इतकी झाली आहे. याशिवाय शासकीय कार्यालयाकडून वीज देयकांपोटी २०७ कोटी थकीत आहेत. महावितरणद्वारे कायमस्वरुपी खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांकडे ६ हजार ४२३ कोटी थकीत आहेत. कृषीपंप ग्राहकांकडे डिसेंबर २०२० अखेरची थकबाकी ४४ हजार ९२० कोटी इतकी झाली आहे हे पाहता महावितरणच्या विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे सुमारे ६४ हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली असल्‍याचे राऊत म्‍हणाले.

Previous articleभगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाहीत तर ‘भाजप’पाल झालेत ; नाना पटोलेंचा प्रहार
Next articleआगीत काडी घालण्याचं काम करू नका ; विरोधकांना अजित पवारांचा टोला