मुंबई नगरी टीम
मुंबई । विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेले पाच महिने संपावर आहेत. त्यामुळे राज्यभरातील एसटीही सेवा ठप्प आहे.याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्यात पाच ते सहा एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.पण महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना गोठल्या असून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा,अन्यथा सभागृह चालू देणार नाही,असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयाने राज्य शासनाला मंजूर करण्याबाबत सूचना केल्या आहेत.हा अहवाल मंजूर करताना आधी मंत्रीमंडळाची मंजुरी घ्यावी लागते तेव्हा येत्या दोन दिवसात हा ठराव मंत्रीमंडळासमोर ठेवून एसटी कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानपरिषदेत दिले.
एसटी कर्मचा-यांच्या संपाचा प्रश्न उपस्थित करताना दरेकर यांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी चर्चा घडवली. चर्चेनंतर समिती गठीत करण्यात आली.तरीही या विषयावर मार्ग निघाला नाही.हा सभापतींचा व सभागृहाचा अवमान आहे. सभापतींच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्र्यांशी सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून विलीनीकरण न करण्याचा निर्णय झाला.परिवहनमंत्री यांची भावना प्रामाणिक होती मग गाडी कुठे अडली ? तीन दिवसात निवेदन सादर करतो, असे सांगून अद्याप निवेदन सादर केलेले नाही, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरण नको ही सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला शिवाय विविध डेपोला भेट दिली. दोन-तीन दिवसात कर्मचारी कामावर येतील यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार की नाही याबाबत सरकार आज उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करणार आहे. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारने उच्च न्यायालयात आधीच सादर केला होता.या समितीने एसटीच्या विलिनीकरणाविरोधात मत नोंदवले आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.आज राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे एसटी कर्मचाऱ्यांसह जनतेचेही लक्ष लागले आहे, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.तसेच एसटी कर्मचा-यांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा दरेकर यांनी दिल्यानंतर सभागृहात गोंधळ सुरु झाला.या गोंधळात सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे काम सुरु झाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी येत्या दोन दिवसात हा ठराव मंत्रीमंडळासमोर ठेवून एसटी कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.