मुंबई नगरी टीम
मुंबई । यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावे,असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की,भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.त्याबद्दल आपण काही बोलणार नाही. तथापि, भारतीय जनता पार्टी बूथपातळीपर्यंत भक्कम संघटनात्मक बांधणी करत आहे. त्याच्या जोरावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचवू. मोदीजींची लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम आणि भाजपाची संघटनात्मक शक्ती यामुळे आगामी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जिंकतील.
केवळ सत्तेसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे घटकपक्ष एकत्र राहिले असले तरी त्यांच्यातील विसंवाद सतत समोर येत आहे. काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या पंचवीस आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निधी वाटपातील अन्यायाबद्दल पत्र लिहिले. प्रशासनाची वाताहत झाली आहे. अधिकारी दबावाखाली आहेत. त्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी तात्पुरत्या नेमणुकीवर केंद्र सरकारमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत तर काहीजण शिष्यवृत्ती मिळवून प्रशिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या धडपडीत आहेत. या सगळ्यात जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. एसटीचा संप, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा समस्या सोडविल्या जात नाहीत.भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. भाजपा ही निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.