दुकानांचे फलक मराठीत,दारूच्या दुकानाला महान व्यक्ती किंवा गड-किल्यांची नावे देता येणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । दुकाने आणि कार्यालयांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम १७ मार्च रोजी जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच कार्यालयांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे.यापूर्वीच्या तरतुदीत १० पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व कार्यालयांना मराठी नामफलक लावण्याची तरतूद नव्हती. याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम,२०१७ मध्ये सुधारणा करणेबाबतचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मान्य झाले असून,या नवीन अधिनियमास १६ मार्च रोजी राज्यपालांनी संमती दिली असल्याने,१७ मार्च पासून हा अधिनियम लागू करण्यात आला आहे.

सदरहू महाराष्ट्र दुकाने व कार्यालयांना अधिनियमान्वये १० पेक्षा कमी कामगार नोकरीवर ठेवणाऱ्या दुकाने व कार्यालयांना मराठी भाषेचा नामफलक लावणे बंधनकारक आहे.मराठी भाषेतील अक्षरलेखन,नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाही अशी तरतूद सदर अधिनियमात करण्यात आली आहे.

Previous articleधनंजय शिंदे, नाना पटोले, भाई जगताप यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार
Next articleयूपीएचे अध्यक्ष कोणालाही करा; लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भाजपाच जिंकणार