मुंबई नगरी टीम
मुंबई । मातोश्रीवर जावून हनुमान चालीसाचे पठण करणारच या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलेल्या आव्हानानंतर झालेल्या प्रकारावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा ठाकरी भाषेत समाचार घेतला.शिवसेनाप्रमुख होते तेव्हा मातोश्रीवर साधू संत सांगून यायचे पण जर दादागिरी करून याल तर आम्हाला दादागिरी कशी मोडायची हे शिवसेनाप्रमुखांनी शिकवले आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वावरून भाजपवरही फटकारे ओढले.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसावरून सुरू असलेल्या आणि भाजपच्या हिंदुत्वावर भूमिका मांडली.तुमच्या घरी हनुमान चालीसा म्हणण्याची नीट संस्कृती नसेल किंवा पद्धत नसेल तर आमच्या घरी या, बोलायची असेल तर जरूर बोला. पण त्याला एक पद्धत असते. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा,शिवसेनाप्रमुख होते तेव्हा आमच्या घरी साधू संत सांगूनव यायचे.पण जर दादागिरी करून याल तर आम्हाला दादागिरी कशी मोडायची हे शिवसेनाप्रमुखांनी शिकवले आहे अशा शब्दात त्यांनी राणा दाम्पत्याचा ठणकावले.यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे म्हणतात.शिवसेनेने हिदुत्व सोडले म्हणायला हे काय धोतर आहे का, की घातले आणि सोडले.जे आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करत आहे.त्यांनी हिंदुत्त्वासाठी काय केले असा सवाल करून, जेव्हा बाबरी पाडली गेली तेव्हा बिळात लपून बसला होता असा हल्लाबोलही त्यांनी केला.
त्यांनी यावेळी हनुमान चालीसावरून सुरू असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समाचार घेतला.सध्या सभांचे पेव फुटले आहे असे सांगून आपणही लवकरच जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.एकदा या सर्वांचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे असेही ते म्हणाले. सध्या नव हिंदु आणि तकलादू नकली हिंदुत्ववादी आले आहेत. तुमचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा आहे असे सांगणा-यांचा या सभेत समाचार घ्यायचा आहे अशा शब्दात त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावले.मला देवळात घंटा बडवणारा हिंदु नको आहे. सीमेवर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा आहे. आमचे हिंदुत्व हे गदाधारी आहे तुमच्या सारखे घंटाधारी नाही अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.