मुंबई नगरी टीम
पुणे । भोंग्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी केलेले टोलचे आणि परप्रांतियांविरोधातील आंदोलन फसलेले आहे.त्यांनी आता भोंग्याविरोधात भूमिका घेतली आहे.त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांनी पाहिले आहे.बोलणारे बोलतात,बोलणारे घरी राहतात,कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असताना नेता मात्र गॅलरीत फेरफटका मारतोय,वा रे वा अशा शब्दात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
काल राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आज पुन्हा राष्ट्रावादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले.आपल्याला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायचा नाही आणि तसा कुणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.आपल्याला सर्वच जाती-धर्माच्या धार्मिक स्थळांचा आदर आहे.त्या ठिकाणी गेल्यावर नतमस्तक होतात.त्यांच्या धर्मात ज्या गोष्टी सांगितल्या आहेत,त्या गोष्टी ते करत असतात आणि ही आपली परंपरा असल्यामुळे राज्यात सध्या जे काही सुरू आहे,ते थांबले पाहिजे असेही पवार यावेळी म्हणाले. राज्याच्या ग्रामीण भागात रात्री उशीरा पर्यंत जागरण गोंधळ,हरीनाम साप्ताह सुरू असतात त्यामुळे भोंग्यांना विरोध केल्याने या कार्यक्रमांवर बंधणे येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.राज ठाकरे यांनी यापूर्वी केलेली आंदोलने फसली असल्याचे पवार यांनी सांगून,त्यांनी जी आता भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत पण त्यांचा नेता फेरफटका मारतोय, वा रे वा अशा शब्दात पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
आम्हाला कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही.जर कुणी चुकीचे वागत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.असा वेळी तो कोणत्या पक्षाचा समर्थक आहे हे बघणार नाही. कुणी कितीही अल्टीमेटम दिले तरी आम्ही ऐकून घेणार नाही. बोलणारे नेते घरी बसतात पण धरपकड होते ती कार्यकर्त्यांची.त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे असेही पवार यांनी स्पष्ट केले.